Vidhan Sabha 2019 : कॅंटोन्मेंटमधील बदल भाजपच्या पथ्यावर?

Vidhan Sabha 2019 : कॅंटोन्मेंटमधील बदल भाजपच्या पथ्यावर?

विधानसभा 2019 
पुणे -  पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे त्यांच्यापुढे आव्हान असेल. तसेच ‘एमआयएम’, वंचित आघाडी, ‘आप’ आदी पक्षांतील मतविभागणी कोणाच्या पथ्यावर याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

‘कॉस्मोपॉलिटन’ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात सुमारे २ लाख ९० हजार मतदार आहेत. शहराच्या मध्य भागापासून पूर्वेपर्यंत कोरेगाव पार्क ते घोरपडीपर्यंत हा मतदारसंघ पसरला आहे. मतदारसंघात दलित, मुस्लिम, पारशी, शीख, जैन तसेच तमीळ, तेलगू आदी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 

दिलीप कांबळे सुमारे साडेचार वर्षे मंत्रिपदावर होते. पक्षाचा एकमेव मातंग चेहरा असल्यामुळे त्यांची राज्यभर भटकंती होती. परिणामी, मतदारसंघाकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले. तुलनेने सुनील कांबळे यांचा मतदारसंघाशी संपर्क होता. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तर, काँग्रेसचे बागवे  यांनी २०१४ मध्ये पराभूत झाल्यापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. 

‘एमआयएम’ने माजी नगरसेविका हीना मोमीन, ‘आप’ने खेमचंद सोनावणे तर बहुजन वंचित आघाडीने लक्ष्मण आरडे यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे प्रचारालाही प्रारंभ  झाला आहे. 

मतविभागणीवर ठरणार भवितव्य
महापालिका तसेच पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीतही येथे बहुसंख्य भाजपचे नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. प्रचारयंत्रणेत त्यांना सुनील कांबळे कसे सहभागी करून घेणार, यावर या मतदारसंघात भाजपचे भवितव्य ठरणार आहे. तर, काँग्रेसमध्ये बागवे यांची उमेदवारी अपेक्षित असल्यामुळे त्यांचे चिरंजीव आणि नगरसेवक अविनाश बागवे यांनी यापूर्वीच प्रचाराचे नियोजन करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. या मतदारसंघातून अन्य घटकपक्षांची मतविभागणी किती आणि कशी होईल, यावर येथील विजयी उमेदवार ठरेल, अशी तरी सध्या चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com