esakal | पुणे : जिल्ह्यात येत्या बुधवारी मंडळस्तरावर फेरफार अदालती
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुणे : जिल्ह्यात येत्या बुधवारी मंडळस्तरावर फेरफार अदालती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये येत्या बुधवारी (ता.८) फेरफार अदालत आयोजित केली आहे. सर्व तालुक्यांत क्षेत्रीय स्तरावर ही अदालत होणार आहे. या फेरफार अदालतीत प्रलंबित फेरफार नोंदी मार्गी लावल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी प्रलंबित आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपापल्या महसूल मंडळाच्या कार्यालयात उपस्थित राहून, मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून आपापले प्रलंबित फेरफार मार्गी लागू शकतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

याबाबत राज्य सरकारने ७ सप्टेंबर २०२० रोजी अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशातील तरतुदीनुसार लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून महसूल मंडळ स्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतीचे आयोजन करणे बंधनकारक आहे. या अदालतीत जनतेच्या प्रलंबित साध्या, वारसा हक्काच्या आणि तक्रारीबाबतच्या फेरफार नोंदी मार्गी लावण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे.

हेही वाचा: गडचिरोली : ऐन पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

याआधी २५ ऑगस्ट २०२१ ला या फेरफार अदालती झाल्या होत्या. या अदालतीत पुणे जिल्ह्यातील एकूण ४ हजार १६८ फेरफार नोंदी मार्गी लावण्यात आल्या होत्या. या फेरफार अदालतींसाठी प्रत्येक मंडळस्तरावर प्रत्येकी एका संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी, तहसीलदार हे वरिष्ठ अधिकारीही भेटी देणार आहेत.

पुणे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत (६ सप्टेंबर) मुदत पूर्ण झालेल्या एकूण १३ हजार ७३५ फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. या प्रलंबित नोंदीमध्ये साध्या, वारसा हक्क आणि तक्रारीबाबतच्या नोंदींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top