पुणेकरांना १५ टक्के कर सवलत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने मिळकतकरात ११ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, कोरोनामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून, त्यात लोकांचे रोजगारही गेले आहेत. तरीही गेल्या वर्षी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात कर भरला आहे.

पुणे : महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या ११ टक्के मिळकतकर वाढीचा प्रस्ताव फेटाळतानाच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या निवासी मिळकतधारकांना महापालिकेच्या सर्वसाधारण करासह इतर करांमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने गुरुवारी घेतला. चालू वर्षीचा कर एप्रिल ते सप्टेंबर (२०२०) या कालावधीत भरलेल्यांनाच ही सवलत असेल. या मिळकतदारांनी पुढील आर्थिक वर्षीचा (२०२१-२२) कर येत्या ३१ मेपर्यंत भरला तरच या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र, व्यावसायिक मिळकतींच्या करात सवलत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने मिळकतकरात ११ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, कोरोनामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून, त्यात लोकांचे रोजगारही गेले आहेत. तरीही गेल्या वर्षी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात कर भरला आहे. मात्र, उत्पन्न वाढीचा मार्ग म्हणून करवाढ नकोच, अशी भूमिका घेत स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी करवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, या प्रस्तावाबाबत बोलाविलेल्या खास सभेत गुरुवारी पुन्हा चर्चा झाली. त्यावेळी नवी करवाढ न करता उलटपक्षी कोरोना काळात वेळेत कर भरलेल्या मिळकतधारकांना कराच्या रक्कमेत १५ टक्के सवलत देण्याच्या उपसूचनेसह सुधारित प्रस्ताव मंजूर केला. करवाढीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेचा विरोध होता.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘या योजनेतून सर्वसाधारण करासह सफाई, पाणीपट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, अग्निशामक कर, मल:निसारण करांत १५ टक्के सवलत आहे. योजनेत पुणेकरांनी सहभागी व्हावे.’’

पिंपरी-चिंचवड विजांच्या कडकडाटासह पाऊस; शहरवासियांची धांदल 

सध्याच्या स्थितीत करवाढ न करण्यावर आम्ही ठाम होतो. लॉकडाउनमुळे सामान्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने करात सवलत जाहीर केली आहे, असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले. दरम्यान, या योजनेची अंमलबजावणी कशी करणार, यावर महापालिका प्रशासनाने मात्र आपली बाजू मांडलेली नाही.

करवाढ टाळल्यानंतर आणि पुणेकरांना पुढील वर्षीच्या करात सवलत देण्यावरून महापालिकेतील सत्ताधारी-विरोधकांत चढाओढ पहायला मिळाली. या मुद्याचे श्रेय घेत महापौर मोहोळ, सभागृहनेते बिडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, योजनेचे श्रेय घेतले. तर करातील सवलत आपल्या भूमिकेमुळेच मिळाल्याचे विरोधी पक्षनेत्या, दीपाली धुमाळ, कॉग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizen will get 15 percentage tax relief