Lockdown : सगळे घरीच बसून आहेत, त्यामुळे पाणीकपात रद्द करा; नागरिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

खबरदारीचा उपाय म्हणून वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. घरात सर्वजण असल्याने पाण्याचा वापर देखील वाढला आहे.

सिंहगड रस्ता : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता परिसरातील पाणीकपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे सिंहगड परिसरात आहेत. धरण उशाशी असून देखील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या भागात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. काही भागात मंगळवार, बुधवार तर काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा केला जात नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी पाणी पुरेसे असते. ते पाणी पाणीकपातीच्या दिवशी वापरावे लागते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. या सगळ्या चक्रामध्ये आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अशी स्थिती बहुतांश सोसायट्यांची आहे. 

- आहारात घ्या, 'क' जीवनसत्व असलेली फळे! वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

तसेच सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन आहे. सोबतच खबरदारीचा उपाय म्हणून वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. घरात सर्वजण असल्याने पाण्याचा वापर देखील वाढला आहे. अशा स्थितीत काही काळासाठी पाणीकपात बंद करण्यात यावी. तसेच दररोज पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

- प्रत्येकाला मिळणार जास्तीचे 5 किलो धान्य, तर गरिबांसाठी 1.7 लाख कोटींचे पॅकेज

पुणे शहरातील माणिक बाग, आनंद नगर, हिंगणे, विठ्ठलवाडी, पानमळा, गणेश मळा, पर्वती पायथा, दत्तवाडी, सिंहगड रस्ता भागातील विविध सोसायटीतील नागरिकांनी याची मागणी केली आहे.  

- लष्कराच्या मदतीची वेळ येऊ देऊ नका :उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी महानगरपालिकेकडे केली आहे. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे दिले आहे.

- कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens demanded for regular water supply in lockdown situation