पुणे : अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाची ढकलाढकली

पुणे शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये बेकायदा फ्लेक्स
Illegal-Flex
Illegal-Flexsakal

पुणे : चमकोगिरीसाठी फ्लेक्स लावून शहर बकाल करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. आजी-माजी नगरसेवक, इच्छुकांसह गल्लीबोळातील गुंड फ्लेक्स लावून दहशत निर्माण करत आहेत. मात्र, यावर कडक कारवाई करण्यापेक्षा महापालिकेच्या विभागांमध्ये समन्वय नाही. सोईस्करपणे डोळेझाक केली जात आहे. मुख्य खाते फक्त धोरण ठरवते, कारवाई करत नाही, असे आकाशचिन्ह विभागाकडून सांगितले जात आहे, तर १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रमुख अधिकारी नसल्याने त्यांनाही विचारणारे कोणी नाही, अशी अवस्था आहे. त्यात परत पोलिसांनीही स्वतःहून फ्लेक्सवर कारवाई करावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारे एकमेकांवर जबाबदारी ढकलून शहराचे विद्रूपीकरण करण्यासह प्रोत्साहन दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी मंगळवारी पुणे शहर व उपनगरात केलेल्या प्राथमिक पाहणीत सुमारे ३९३७ अनधिकृत फ्लेक्स असल्याचे आढळले होते. यावर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे पाठविल्या असून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

तुम्हाला काय वाटते?

मिळेल तिथे व मिळेल तसे फ्लेक्स लावून पुण्याची विद्रूपीकरण करण्यात आले आहे. याबाबत आपले मत editor.pune@esakal.com यावर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर पाठवा.

पुणे शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये बेकायदा फ्लेक्स लावले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने व पादचारी मार्गाने चालण्यासाठी धड रस्ताही शिल्लक नसतो. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ३ हजार ९३७ बेकायदा फ्लेक्स आढळून आल्याने विद्रूपीकरणाचे वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय लांडगे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

प्रश्‍न : आकाशचिन्ह विभागाकडून कसे काम केले जाते?

उत्तर :आकाशचिन्ह विभागाकडे होर्डिंग संदर्भात परवाने देणे, शुल्क ठरवणे, कारवाईचा दंड निश्‍चीत करणे याचे धोरण ठरविले जाते. त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. तसेच महापालिकेकडून दिले जाणारे परवाने, शुल्क भरणा यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे.

प्रश्‍न : फ्लेक्सवर कारवाईचे महापालिकेचे नियोजन कसे आहे?

उत्तर : २०१८ पासून शहरातील बेकायदा फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग यावर क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई केली जाते. त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व अधिकारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. आकाशचिन्ह निरीक्षक, बिगारी यांच्यामार्फत कारवाई केली जाते. या क्षेत्रीय कार्यालयांवर संबंधित झोनचे उपायुक्त व अतिरिक्त आयुक्तांचे नियंत्रण असते.

प्रश्‍न : नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी काय केले जाते?

उत्तर : फ्लेक्स लावू नये मानसिकता बदलण्यासाठी महापालिकेकडून उपक्रम राबविला जात नाही. अशा लोकांची मानसिकता बदलणे अवघड असल्याने त्यांच्यावर थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाईच आवश्‍यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाकडून वारंवार कारवाई केली जाते.

प्रश्‍न : फ्लेक्ससाठी परवानगी देताना काय नियम असतात?

उत्तर : वाढदिवस किंवा इतर कारणांच्या फ्लेक्ससाठी महापालिका परवानगी देत नाही. शासकीय कार्यक्रम असतील तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून एक दोन दिवस फ्लेक्स लावण्यास परवानगी दिली जाते. त्याचे शुल्कही घेतले जाते. पण हा फ्लेक्स लावताना वाहतूक, नागरिकांना अडथळा होणार नाही अशा ठिकाणीच लावावे लागतात.

प्रश्‍न : कारवाई करताना राजकीय दबाव असतो का?

उत्तर : कारवाई करताना राजकीय दबाव नसतो, जेथे संवेदनशील कारवाई असते तेथे पोलिसांची मदत घेतली जाते.

प्रश्‍न : दबाव असेल तर कारवाई करता का?

उत्तर : दबाव आणणाऱ्यांवर आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ७० जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. महापालिकेकडून दिवसभर कारवाई सुरू असते, पण रात्रीच्या वेळी फ्लेक्स लावण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा वेळी रात्रीच्या राऊंडला असलेल्या पोलिसांनीही या फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, कायद्यामध्ये पोलिसांवरही जबाबदारी आहे.

‘सकाळ’ने फ्लेक्सबाजीला रीतसर वाचा फोडली ते बरे केले. आम्ही नागरिक म्हणून या सोम्यागोम्यांचे चेहरे का म्हणून पाहायचे? लोकप्रतिनिधींचे कामच जर लोकसेवा असेल तर त्याचा अशा विद्रूप पद्धतीने कामाचा बागुलबुवा का करायचा?... बरं यांनी याचा खर्च ‘जनतेच्या पैशातून’ केला असे जाहीर लिहावे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे असे हजारो फ्लेक्स अनधिकृत आहेत. या सगळ्याला बाबूगिरीचा किती भक्कम पाठिंबा आहे, हे उघड झाले.

- प्रा. स्वप्नील कांबळे, डेक्कन

फ्लेक्स लावणे चुकीचे आहे, मग ते अधिकृत अथवा अनधिकृत असो. फ्लेक्स लावण्यावर सरकारने कायदा करून ही प्रथा बंद करावी. राजकीय नेत्यांचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर फ्लेक्स न लावता चौकाचौकात झाडे लावावीत.

- अंकुश तिकोने

हा विषय हाती घेतल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन. जाहिरातबाजी करणाऱ्यांनी महापालिकेचे योग्य पैसे भरून जाहिरात करावी. माहिती म्हणून असे फ्लेक्स एक-दोन दिवस ठेवावेत आणि न विसरता काढावेत. शहरातील काही भागात मागील दिवाळीचे फ्लेक्स अजून वेडेवाकडे लटकलेले दिसत आहेत.

- अशोक येवले, केशवनगर-मुंढवा

प्रसिद्धीची हौस आणि चमकोगिरी, अडेलतट्टूपणामुळे फ्लेक्स लावण्याची स्पर्धा लागते. आजकाल कोणीही उठतो अन् लहान मुलांच्या वाढदिवसाचेही फ्लेक्स लावतो. मुळात संवेदनशीलता व गांभीर्याचा अभाव असल्यामुळेच असे घडते. दंड व शिक्षा ही नंतरची मलमपट्टी ठरते.

- राजन बिचे, बिबवेवाडी

कोणत्याही प्रकारच्या फ्लेक्सला एक कालावधी निश्चित केला पाहिजेत. संबंधित तारखेच्या दोन दिवस आधी फ्लेक्स लावला गेला पाहिजे आणि त्यांनतर दोन दिवसांच्या आत तो काढला गेला पाहिजे. असे न केल्यास दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करावी.

- परेश भिलारे, धनकवडी

शहरात गेल्या दोन वर्षांत ज्या पोटतिडकीने विनामास्कवाल्यांना ५०० ते २००० दंड लावला गेला, तसाच अनधिकृत फ्लेक्सवाल्यांना आकाराप्रमाणे दंड लावावा. प्रत्येकी २००० जरी दंड आकारल्यास ७५ ते ८० लाख रुपये एका रात्रीत जमा होतील.

- आकाश कोळपकर, वारजे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com