esakal | पुणे शहरातील पोलिसांनाही बसतोय कोरोनाचा फटका; आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune city Corona 11 police died till now

- दोन दिवसांपुर्वी एका पोलिसाचा मृत्यू 
- पोलिसांनाही कोरोनाचा फटका
- १३२ पोलिसांना संसर्ग; वर्षभरात ११ जणांनी गमावला जीव

पुणे शहरातील पोलिसांनाही बसतोय कोरोनाचा फटका; आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिसांना बंदोबस्त करावा लागत असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्याची तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागत आहे. मागील एक महिन्यात तब्बल १३२ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आत्तापर्यंत ११ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दोन दिवसांपूर्वीच एका ५६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला आहे.

मागील वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी डॉक्‍टर, परिचारीकांप्रमाणेच पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. दरम्यान, नागरीकांना कोरोनापासून दूर ठेवतानाच एप्रिल २०२० पासून आत्तापर्यंत १६९६ पोलिसांना कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, त्यानंतर पुढच्या तीन-चार महिन्यात हे प्रमाण कमी झाले. त्यानुसार, पोलिस दलामध्येही कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढू लागला. त्यामुळे नागरिकांशी सर्वाधिक संपर्क येणाऱ्या पोलिसांनाही त्याचा फटका बसण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत १३२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये २४ अधिकारी आहेत, तर १०८ पोलिस कर्मचारी आहेत. त्यापैकी ३ अधिकारी व १६ कर्मचारी अशा १९ जणांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित २१ अधिकारी व ९२ पोलिस कर्मचारी अशा एकूण ११३ पोलिस गृहविलगीकरणामध्ये असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, बिनतारी संदेश विभागातील ५६ वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

''कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी वेळोवेळी संबंधित पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जात आहे. कोरोनाबाधित पोलिस, पोलिस ठाणे व रुग्णालये यांच्याशी समन्वय ठेवण्याचे काम सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील यादव करीत आहेत. त्याचबरोबर संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही बाधित पोलिसांना तत्काळ वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबरोबरच पोलिसांच्या दवाखान्यात रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.''
- डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

अशी आहे स्थिती
-एकूण पोलिस अधिकारी - ७४४
-एकूण पोलिस कर्मचारी - ७९००
-सध्या कोरानाबाधित पोलिस - १३२
-वर्षभरातील कोरोनाबाधित पोलिस - १७७६

loading image