यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

या स्पर्धेसाठी महापालिकेने जोरदार तयारी करीत संपूर्ण शहर आणि उपनगरे चकाचक ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात रस्त्यावरील कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणण्यापासून सावर्जनिक आणि वैयक्तिक पातळीवरचे स्वच्छतागृहे नीटनेटकी करण्यात आली होती.

पुणे : देशपातळीवरच्या स्वच्छतेच्या स्पर्धेत गेल्या वर्षी मागे पडलेल्या पुणे शहराने यंदा मात्र आघाडी घेतली असून, भारतात १५, तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. सार्वजनिक ठिकाणी राखलेल्या स्वच्छतेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. विशेषत: कचरामुक्त (कंटेनरमुक्त) या घटकातही चांगली कामगिरी असल्याचे स्पर्धेच्या निकालातील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर म्हणजे, स्वच्छ मोहिमेत पुणेकरांचा सहभागी कमी पडल्याचा ठपका महापालिकेवर ठेवला गेला आहे. 

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​

केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानातर्गंत होणाऱ्या स्पर्धेत बहुतांशी राज्यातील शहरांचा समावेश होता. स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे २०१४ पासून यंदाही इंदूर आघाडी घेत पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर नवी मुंबई शहराला दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आहे. पुण्यासोबतच ठाणे आणि नाशिकचा पहिल्या पंधरा शहरांच्या यादीत समावेश आहे. 

या स्पर्धेसाठी महापालिकेने जोरदार तयारी करीत संपूर्ण शहर आणि उपनगरे चकाचक ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यात रस्त्यावरील कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणण्यापासून सावर्जनिक आणि वैयक्तिक पातळीवरचे स्वच्छतागृहे नीटनेटकी करण्यात आली होती. त्यानंतर या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग वाढविण्याच्या हेतूने निरनिराळे कार्यक्रमही घेण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या (थर्ड पार्टी) पथकामार्फत संपूर्ण शहराची पाहणीही झाली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात पुणे शहराने स्वच्छतेची गुणवत्ता वाढविल्याचे दिसून आले आहे. 

Video : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे काय आहेत आव्हाने?; पाहा 'सकाळ स्पेशल इंटरव्ह्यू'मध्ये!​

सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी आणि प्रचंड खर्च करूनही गेल्या वर्षी स्वच्छ स्पर्धेत पुणे शहराची घसरण झाली होती. तेव्हा पुण्याचा देश पातळीवर ३७ आणि राज्यात ८ वा क्रमांक आला होता. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका झाली होती. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सल्लागार नेमूनही स्पर्धेत पिछेहाट झाल्याने महापालिकेवर नामुष्की ओढविली होती. त्यावेळी सादरीकरणात कमी पडल्याची कबुली देत तत्कालीन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कामगिरी सुधारण्याचे संकेत दिले होते. या पार्श्‍वभूमीवर मागील चुका दुरुस्त करीत यंदा यश मिळविल्याचे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. 

देशातील पहिल्या पाच शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश होईल, यादृष्टीनेच तयारी केली होती. परंतु, ज्या घटकांत कमी पडलो आहोत, त्यात सुधारणा करून नव्याने तयारी केली जाईल. पुणेकरांच्या सहकार्यातून स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी प्रयत्न करू. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city won 15th and 4th rank in India and Maharashtra respectively in National level cleanliness competition