esakal | 'चल सर्जा, चल राजा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीत हाकली बैलगाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Collector

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या बैलगाडीचा कासरा हातात धरत बैलगाडीही हाकली.

'चल सर्जा, चल राजा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीत हाकली बैलगाडी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बारामती तालुक्यातील मेडद येथे जेसीबीसह बैलगाडी चालविण्याचा आनंद घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.१४) बारामतीत महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देशमुख बारामतीत आले होते. त्यानंतर तालुक्यातील मेडद येथे पाणंद रस्त्याचे काम त्यांनी जेसीबी चालवत सुरू केले. मेडद गाव ते कऱ्हा नदीच्या पूलापर्यंतचे दीड कि.मी. लांबीचे हे काम आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेही या प्रसंगी उपस्थित होते. 

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या बैलगाडीचा कासरा हातात धरत बैलगाडीही हाकली. जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीत येऊन जेसीबी आणि बैलगाडी चालविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला होता.

हेही वाचा - हॉटेलमधील हुक्का पार्लरला राजकीय नेते मंडळी व हितसंबंधामुळे राजाश्रय

बारामती तालुक्यामध्ये एकूण 133 रस्ते पाणंद म्हणून प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि तहसिलदार विजय पाटील यांनी दिली. या पैकी 14 कि.मी. लांबीची 13 कामे पूर्ण झाली आहेत. ही जवळपास सर्वच कामे लोकसहभागातून येत्या मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन कांबळे आणि पाटील यांनी बोलून दाखविले. 

रविवारी मेडद येथील रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाणंद रस्त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल, त्यामुळे हे रस्ते वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top