पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाने 'झेडपी'चे थकविले एक कोटींचे भाडे

गजेंद्र बडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- भाडे द्या, अन जागा सोडा : अध्यक्ष देवकाते यांचा आदेश

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हा परिषदेच्या जुन्या
इमारतीचे सुमारे एक कोटी रुपयांचे भाडे थकले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय वेळेत भाडेही देत नाही आणि जिल्हा परिषदेची जागाही सोडत नाही. यामुळे सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्य संतप्त झाले आहेत. त्यानुसार काही सदस्यांनी हा मुद्दा मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून थकलेले भाडे त्वरित वसूल करावे आणि त्यांच्या ताब्यातून झेडपीची जागा रिकामी करून घ्यावी, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

जिल्हा परिषदेची जुनी इमारत ससून रुग्णालयाच्या चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आहे. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी या दोन्ही कार्यालयांसाठी नवीन इमारती
बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निधीही उपलब्ध करून दिला होता. यापैकी पहिल्यांदा जिल्हा परिषदेची नवीन इमारत पूर्ण झाली. त्यामुळे जुन्या जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालये नव्या इमारतीत हलविण्यात आली. त्यामुळे जुनी जिल्हा परिषद रिकामी झाली होती. यापैकी काही जागा हवेली
पंचायत समितीच्या मुख्यालयाला तर, काही जागा जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाचीही नवीन इमारत पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक कार्यालये या नवीन इमारतीत स्थलांतरित झाली आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कार्यालये अद्यापही झेडपीच्या जुन्या इमारतीत ठाण मांडून आहेत. या जागेचे भाडे मात्र जिल्हा परिषदेला कधीच
वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यानुसार अध्यक्ष देवकाते यांनी हा आदेश दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Collector Office Pending ZPs Rent of rs 1 Crore