वडगाव शेरीतील प्रलंबित रस्त्यांना आयुक्तांची 'सरप्राईज व्हिजिट'

अन्वर मोमीन
Thursday, 20 August 2020

प्रत्येक रस्त्यांची जागेवर जाऊन घेतली माहिती

रस्त्यांबाबत बैठक घेऊन कार्यवाही करणार

वडगाव शेरी : नदीकाठच्या शिवणे-खराडी रस्त्यासह वडगाव शेरीतील रखडलेल्या रस्त्यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह आमदार सुनिल टिंगरे यांनी बुधवारी सरप्राईज भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे स्थानिक पालिका अधिकार्‍यांना यासंबधीची कल्पना न देता आयुक्तांनी थेट प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रत्येक रस्त्यांची माहिती घेतली. याबाबत लवकरच सर्व विभागांची बैठक घेऊन रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

नगर रस्त्यासह वडगाव शेरी, विमाननगर, धानोरी या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहेत. या भागातील अनेक रस्ते विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटत नाही. त्यात प्रामुख्याने शिवणे-खराडी रस्त्यासह विविध रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार टिंगरे यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात हा प्रश्न सोडविण्याबाबत संबधितांना सुचना देण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळीच आयुक्त कुमार यांनी आमदार टिंगरे यांच्या समवेत प्रत्येक रस्त्यांची पाहणी केली. 

यावेळी कल्याणीनगरमध्ये भूसंपादनाभावी रखडलेल्या नदीकाठचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन येथील प्रलंबित विकासकामांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी विमाननगरमधील कोनार्क नगर येथील अनेक वर्षे प्रलंबित असलेला रेड्डी ढाबा ते सीसीडी चौक रस्ता, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी जकात नाका रस्ता, धानोरीतील पॅरेडीयम ते सेव्हन हेवन सोसायटी रस्ता, धानोरी जकात नाका ते डीवाय पाटील कॉलेजकडे जाणारा डीपी रस्ता, विश्रांतवाडी येथील रस्त्यामधील बुध्दविहाराचे स्थलांतर, तसेच कॉमर्स झोन ते अग्रसेन हायस्कूल रस्ता अशा सर्व ठिकाणी आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत संबधित सर्व विभागांकडून रखडलेल्या रस्त्यांची माहिती मागवून घेऊ आणि संबधितांची बैठक घेऊन या रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन आयुक्त कुमार यांनी आमदार टिंगरे यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे उपस्थित होते.

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

 

(Edited by : sharayu kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Commissioner surprise visit to Wadgaon Road for pending work road