pune: सहकारी संस्थेच्या प्रगतीनुसार शेअर्समध्ये वाढ व्हावी : अनास्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर्स

सहकारी संस्थेच्या प्रगतीनुसार शेअर्समध्ये वाढ व्हावी : अनास्कर

पुणे : ‘‘सहकारी संस्थेच्या आर्थिक प्रगतीनुसार त्या प्रमाणात सभासदांच्या भाग मूल्यांमध्येही (शेअर्स) वाढ होणे अपेक्षित असून, त्यासाठी सहकार कायद्यामध्ये स्वतंत्र तरतूद करणे आवश्यक आहे. या बदलामुळे सभासदांच्या भाग मूल्यांमध्ये वाढ झाल्यास लाभांशात वृद्धी होऊन सभासदांचीही वाटचाल समृद्धीच्या दिशेने होईल,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विद्याधर अनास्कर यांनी केले.

सहकार नेते खासदार गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एस.एम. जोशी फाउंडेशन सभागृहात मंगळवारी ६८ व्या सहकारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित ‘सहकारातून समृद्धीकडे या चर्चासत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींकडून रोजगार हमीचे एकही काम नाही

अनास्कर म्हणाले, ‘‘संस्थेच्या गंगाजळीमध्ये (रिझर्व्ह फंड) असलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम सभासदांच्या शेअर्समध्ये वाढवून मिळणे अपेक्षित आहे. तसेच, आंतरराज्यीय पतसंस्थांना विविध व्यवसाय करण्यासाठी असलेली सवलत राज्यातील इतर पतसंस्थांनाही द्यावी. जेणेकरून व्यवसायाच्या दृष्टीने समान संधी उपलब्ध होतील. व्यवसायातील सवलती मिळविण्यासाठी सध्या आंतरराज्यीय सहकारी पतसंस्थांमध्ये रूपांतर करण्याचा राज्यातील पतसंस्थांचा ओढा कमी होईल. या संदर्भात राज्य सहकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे शिफारस करण्यात येणार आहे. सहकार ही शासनप्रणित चळवळ आहे. त्यामुळे सहकार विभागाने प्रशासकाच्या भूमिकेत न राहता विकासकाच्या भूमिकेत काम करावे. सहकारी संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देण्याची गरज आहे.

माजी महापौर अंकुश काकडे, कॉसमॉस को-ऑप. बॅंकेचे संचालक मुकुंद अभ्यंकर, अध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर, विश्वेश्वर सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी यांनी आपले विचार मांडले. विश्वेश्वर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, राज्य सहकारी संघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकूर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रमाचे संयोजक जयराम देसाई यांनी केले. तर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी आभार मानले.

loading image
go to top