पुणे : गुटखा हवाला रॅकेटचा पर्दाफाश; 3.5 कोटींची रोकड अन् 9 जण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास केला जात होता. त्यावेळी सुरेश अगरवाल याच्या चौकशीमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक नवनाथ नामदेव काळभोर हा गुटखा पुरवित असल्याचे पोलिसांना समजले.

पुणे : पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता.३) दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या पाच भागात छापे घालून गुटखा हवाला रॅकेटचा पदार्फाश केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तब्बल साडे तीन कोटी रुपयांची रोकड जप्त करुन नऊ जणांना अटक केली. या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊन मुख्य आरोपींपर्यंत पोचण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

असा लागला 'हवाला'चा शोध! 
अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाकडून शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खराडी येथे एका व्यक्तीकडून चोरुन बंदी असलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू, केंद्र आणि राज्य सरकारचा सीमाशुल्क चुकवून तस्करी केलेले महागडी सिगारेट विक्री करीत असल्याची खबर युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांना मिळाली होती. त्यानुसार, 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी खराडी येथील एका दुकानावर छापा घालून सुरेश मुलचंद अगरवाल (वय 54, रा. साई एनक्‍लेव्ह सोसायटी, खराडी) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि दोन कार, एक दुचाकी व एक लाख 31 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. 

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला; मित्राच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला बलात्कार​

गुटखा पुरवठा करणारा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जाळ्यात 
या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास केला जात होता. त्यावेळी सुरेश अगरवाल याच्या चौकशीमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक नवनाथ नामदेव काळभोर हा गुटखा पुरवित असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा या प्रकरणातील गुटख्याचे मुख्य विक्रेते दोघेजण असून त्यांना गुटखा विक्री करण्यासाठी हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण केली जात असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

Corona Updates: विमानाने पुण्यात आलेले 21 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह​

आणि प्रत्यक्षात हवाला रॅकेटचा पर्दाफाश! 
शहराच्या मध्यवर्ती भागात भागामध्ये गुटखा व्यवसायिकांचे हवाला रॅकेट सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी पाच पथके तयार करण्यात आली. या पाचही पथकांनी बुधवारी सकाळी सात ते रात्री 10 या वेळेत शहराच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी छापे घातले. तेथून पोलिसांनी तब्बल तीन कोटी 52 लाख 74 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये तीन कोटी 47 लाख 37 हजार 920 रुपयांचा समावेश होता. त्याचबरोबर पोलिसांनी नऊ मोबाईल, दोन डिव्हीआर, पैसे मोजण्याचे दोन मशीन व व्यवहारांच्या वह्या असा महत्वपुर्ण मुद्देमालही जप्त केला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, त्यांचे पथक, परिमंडळ एकमध्ये येणाऱ्या पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune cops arrested 9 persons and seized 3 crore in Hawala racket