Maha_Vikas_Aghadi
Maha_Vikas_Aghadi

'जागा किती मिळणार हे आधी ठरवा, मगच महाविकास आघाडीचा निर्णय घ्या!'

पुणे : "आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यापूर्वी पक्षाला किती जागा मिळणार हे आधी ठरवा, त्यानंतरच आघाडीबाबतचा निर्णय घ्या,'' असे शहर कॉंग्रेसच्या बैठकीत एकमताने ठरले. आगामी निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी बोलाविलेल्या या बैठकीत अनेकांनी आपली दुखणी या निमित्ताने मांडून घेतली. 

शहर कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, प्रदेश आणि शहर पदाधिकारी यांची शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत दोनचा की सिंगल वॉर्ड, महाविकास आघाडी सहभागी व्हावे की नाही, यासह विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी सिंगल वॉर्डची आग्रही भूमिका मांडली. तर काहींनी दोनच्या प्रभागाला सहमती दर्शविली. तसे झाले, तर जागा वाटपात कॉंग्रेसला स्थान मिळू शकले, असे सांगितले. 

तेव्हा एका पदाधिकाऱ्याने वॉर्ड की प्रभाग कितीचा असावा, यापेक्षा निवडणुकीत एकमेकांना सहाय करा. मागच्या निवडणुकीत तर माझा 'कार्यक्रम'च करायचा असे पक्षाने ठरविले होते की काय? आधी एकत्र या, निवडणूक झाल्यानंतर आपण भांडू. गेल्या निवडणुकीत मी चार तिकिटे मागितली, पण पक्षाने दिली नाही. त्यामुळे मी एकटा उभा राहिलो आणि निवडून आलो. काहीजणांनी निवडणुकीतून माघार घेतली. ते उभे राहिले असते, तर पक्षाची संख्या दोनने वाढली असती. काहीजण असे ऐनवेळी माघार घेतात, असा टोलाही एका पदाधिकाऱ्याला लगाविला. तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळणाऱ्या वागणूकीबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. 

अनेक गोष्टीत शहर कॉंग्रेस म्हणून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. अध्यक्ष तुम्हाला अडचण येत असेल, तर आम्हाला बोलवा, आम्ही ती मांडू, असे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने अध्यक्षांना सूचना केली. त्यावर पुणे विद्यापीठ पूल पाडण्यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना फोन केला, तर त्यांनी पालकमंत्र्यांचे नाव पुढे करून गप्प बसण्याच्या सूचना केल्या, काय करणार, अशा शब्दात आपली व्यथा एका नेत्याने मांडली. आपण जरी काही ठरवत असलो, तरी पक्षश्रेष्ठी शहर कॉंग्रेसला विचारात घेत नाहीत. राज्यातील एकही नेता अजित पवार यांच्यामुळे पुण्यात लक्ष घालण्यास तयार नाही, असे एका पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. अखेर आजच्या बैठकीत झालेली सर्व चर्चा पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यात येईल, असे सांगून कोणताही ठोस निर्णय घेता बैठक संपविण्यात आली. 

वॉर्डरचनेसह विविध कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचवेळी "गेल्या निवडणुकीत जे पक्षाबाहेर गेले त्यांना परत आणण्यासाठी, तसेच जे सध्या पक्षात आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, त्यासाठी सुद्धा कमिटी नेमा,' अशी देखील सूचना बैठकीत करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com