सलग दुसऱ्या दिवशी पुणेकरांकडून संचारबंदीला चांगला प्रतिसाद 

Pune Corona
Pune Corona

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या संचारबंदीला सलग दुसऱ्या दिवशीही पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सायंकाळी सहा वाजल्यानंतर सर्व दुकाने बंद झाली, रस्त्यावरील वाहनांची गर्दी ओसरली, त्यानंतर हळूहळू रस्त्यावर दिसणारे नागरीकही कमी झाले. काही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरीकांव्यतिरीक्त अन्य नागरीकांनी घराबाहेर पडण्यास टाळले. संचारबंदीचा दुसरा दिवस हा रविवारी आला. नागरीकांकडून रविवारी विविध प्रकारच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार, रविवारीही दिवसभर शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा, बाजारपेठातील बहुतांश दुकानांमध्ये नागरीकांनी चांगलीच गर्दी होती. विशेषतः लक्ष्मी रस्ता, महात्मा फुले मंडई, मार्केट यार्ड व अन्य बाजारपेठेमध्ये नागरीकांनी कपडे, भाजीपाला, किराणा, धान्य खरेदी करण्यास प्राधान्य दिले. हॉटेल्स, खानावळींना बंदी असली तरीही पार्सल सुविधा उपलब्ध असल्याने पार्सल नेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा होत्या. त्याचबरोबर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही नागरीकांची गर्दी कायम होती. 

दिवसभरानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कामगारांना लवकर बाहेर पडून घरी जाता आले. सायंकाळी सहा वाजल्यानंतर बहुतांश दुकाने बंद झाली. रस्त्यावरील स्टॉल्स, टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या, रसवंती गृह, छोटी दुकाने काही वेळ सुरू राहील्याने तेथे खरेदीसाठी नागरीक वळले. थोड्या वेळातच तेही बंद झाल्यानंतर नागरीकांनी घरचा रस्ता धरला. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी झाली, तरी काही काळ नागरीकांची गर्दी दिसत होती. 

सायंकाळी सात वाजल्यानंतर वाहनांबरोबरच नागरीकांचीही संख्या रोडावली. त्यानंतर तुरळक नागरीक, वाहने वगळता रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. कात्रज,सिंहगड रस्ता, घोरपडी, खडकवासला, उत्तमनगर, औंध, सहकारनगर, रामटेकडी, खराडी, चंदननगर, बाणेर, बालेवाडी, केशवनगर, मुंढवा या उपनगरांमध्येही सायंकाळी शुकशुकाट होता. शहरातील प्रमुख रस्ते, मोठे चौक, अंतर्गत रस्त्यांसह ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांकडून नागरीकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले जात होते. तसेच बॅरीकेडस्‌ लावून रस्ते बंद करण्यात आले. त्यानंतर ये-जा करणाऱ्या नागरीकांकडे पोलिसांकडून ओळखपत्र, पत्र व अन्य कागदपत्रे तपासून त्यांना सोडण्यात येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com