esakal | पुणे विभागासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी 5 लाख डोस; पुणे शहरासाठी सर्वाधिक डोस
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

पुणे जिल्ह्यासाठी सव्वातीन लाख कोरोना डोसेस मिळाले असून पुणे शहरासाठी १ लाख ४० हजार डोस मिळाले आहेत.

पुणे विभागासाठी कोविशिल्ड लसीचे आणखी 5 लाख डोस; पुणे शहरासाठी सर्वाधिक डोस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे विभागासाठी बुधवारी कोविशिल्डचे ५ लाख १३ हजार ८६० डोस मिळाले आहेत. यापैकी सर्वाधिक ३ लाख २५ हजार ७८० डोस पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण डोसपैकी पुणे व पिंपरी चिंचवडला प्रत्येकी १ लाख ४० हजार तर, ग्रामीण भागासाठी ४५ हजार ७८० डोस वितरित करण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्याला आणखी १ लाख अतिरिक्त डोस मिळणार आहेत. राज्यात येत्या १ एप्रिलपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. शिवाय याआधीच्या दोन टप्प्यात लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस दिला जाणार आहे. यानुसार ज्या व्यक्तींनी पहिला डोस कोविशिल्ड लसीचा घेतला आहे. त्यांना दुसरा डोसही कोविशिल्डचाच दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी सांगितले. पुणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला होता. या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, फ्रंटलाईन कामगार आदींना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्ष वयाच्यापुढील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. आता तिसरा उद्यापासून (१ एप्रिल) सुरू होत आहे. या टप्प्यात ४५ वर्ष वयापुढील सर्वांना सरसकट लस दिली जाणार आहे.

हेही वाचा - बारामतीत कोरोनाचा कहर; सिल्व्हर ज्युबिलीतील कॉरीडॉरच झाला वॉर्ड

कोरोना लसीकरणात आतापर्यंत पुणे जिल्ह्याने सातत्याने राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्ह्याची पात्र लोकसंख्या आणि नवीन कोरोना संख्याही जास्त असल्याने जिल्ह्यात लसीकरणाला प्रथमपासूनच गती देण्यात आली आहे. दरम्यान, पालकमंत्री अजित पवार यांनी २६ मार्च घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत १ एप्रिलपासून लसीकरण केंद्र वाढविण्याचा आदेश दिला होता. त्यासाठी आवश्‍यक तेवढी जास्तीची लस प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली होती. त्यानुसार आज ही लस प्राप्त झाली आहे.

हेही वाचा - डॉ. दळवी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे हाल; कर्मचारीवर्ग वाढवण्याची मागणी
असे झाले लसीचे वाटप

  • - पुणे शहर --- १ लाख ४० हजार
  • - पिंपरी चिंचवड --- १ लाख ४० हजार
  • - पुणे ग्रामीण --- ४५ हजार ७८०
  • - कोल्हापूर जिल्हा --- ९६ हजार ७८०
  • - सातारा जिल्हा --- ५९ हजार ४५०
  • - सांगली जिल्हा --- २८ हजार ७५०
  • - सोलापूर जिल्हा --- ३१००
loading image