Pune Corporation Power Scam : विनानिवीदा एक कोटीचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
विनानिवीदा एक कोटीचे काम

Pune Corporation Power Scam : विनानिवीदा एक कोटीचे काम

पुणे : कोरोना काळात विनानिविदा एक कोटीचे काम झाल्याचे दाखवून त्याचे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा घोटाळा समोर आल्याने याचे पडसाद आज (गुरुवारी) महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले. नगरसेवकांनी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर टीका करत अशा अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार असा प्रश्‍न केला. सभागृहात संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर याच्या चौकशीसाठी दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल. फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आज मुख्यसभेत दिले.

कोरोनाकाळात स्मशानभूमीतील कामांच्या निविदा न काढताच सुमारे एक कोटी रुपयांची बोगस बिले सादर केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यावर मनसेतर्फे मुख्यसभेत आंदोलन करण्यात आले. यास महाविकास आघाडीनेही पाठिंबा देत या विषयावरील चर्चेची मागणी केली.

वसंत मोरे म्हणाले, ‘‘संपूर्ण शहर कोरोनात एकजुटीने लढत असताना स्मशानभूमीतील कामाच्या नावाखाली पैसे लुटण्याचा प्रयत्न झाला. यातून महापालिकेची बदनामी झाली आहे. यामागे कोणते अधिकारी आहेत याचा शोध घेऊन कारवाई करा.’’

पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘‘सध्या एकच विषय समोर आला आहे, अशा प्रकारे अनेक बिल काढले गेल्याची शक्यता आहे. महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही.’’

‘‘प्रत्येक अधिकाऱ्याच्या हातातून फाइल गेल्यानंतर अखेरच्या टप्प्यात एका अधिकाऱ्याला हा घोटाळा लक्षात येतो. ही गंभीर बाब आहे. कोरोना काळात झालेल्या विषयांची चर्चा का केली नाही याचा उलगडा या घोटाळ्यामुळे झाला आहे’’, अशी टीका विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केली. कोरोनात स्मशानभूमी, दफनभूमीच्या ठिकाणी भ्रष्टाचार केला हे गंभीर आहे, असे काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी सांगितले. तर

अविनाश बागवे म्हणाले यांनी, ‘‘आता अधिकाऱ्यांची नावे या घोटाळ्यात येऊ नयेत यासाठी ठेकेदार व त्याच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.’’

‘‘कोरोना काळातील कामाचा व खर्चाचा अद्याप हिशेब दिला नाही. विद्युत विभागात उलट सुलट कामे होत असताना या विभागाचे अधिकारी श्रीनिवास कंदुल यांना पाठीशी घातले जात आहे. अनेक पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या पाठिंब्याशिवाय हे काम होऊच शकत नाही, असा संशय अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, ‘‘भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडणाऱ्याला एकालाही पाठीशी घालू नका. ज्यादिवशी हा प्रकार समजला त्यावेळी तातडीने गुन्हा दाखल करा. प्रशासनाचे बारकावे माहिती असलेल्या व्यक्तिशिवाय अशी बोगस बिले तयारच होऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना आम्ही सोडणार नाही.’’

loading image
go to top