Pune News : सिंहगडावरील 'विक्रेताच' निघाला 'चोर'!

साडेसात लाखांच्या मशिन विकल्या केवळ पंधरा हजारांना
pune crime at sinhagad shopholder thief six of nine accused arrested
pune crime at sinhagad shopholder thief six of nine accused arrestedesakal

सिंहगड: सिंहगडावर कचरा प्रकल्पासाठी आणण्यात आलेल्या मशिनरी चोरीची घटना उघड करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून नऊ पैकी सहा आरोपींना अटकही करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे सिंहगडावरीर एक खाद्यपदार्थ विक्रेताच या चोरीचा 'मास्टर माईंड' असल्याचे निष्पन्न झाले असून चोरलेले साडेसात लाखांचे साहित्य या चोरांनी केवळ पंधरा हजार रुपयांना एका भंगार व्यावसायिकाला विकले आहे. संबंधित भंगार व्यावसायिकालाही पोलीसांनी अटक केली आहे.

सिंहगडावरील गाडीतळावर कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी बसविण्यात आलेले महागडे साहित्य चोरीला गेल्याची घटना 22 डिसेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर वन विभागाने हवेली पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. संबंधित ठिकाणी कोणीही प्रत्यक्षदर्शी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरीचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना तातडीने एकत्रित तपास करुन गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अजित भुजबळ,राजू मोमिन, पोलीस नाईक गणेश धनवे, अमोल शेडगे, राजेंद्र मुंढे, बाळासाहेब खडके, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत,दगडू विरकर, रजनीकांत खंडाळे यांचे पथक सलग पंधरा दिवस याचा तपास करत होते. सिंहगडावर जाणाऱ्या खेडशिवापूर व डोणजे या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर काही संशयित फोन कॉल झाल्याचे तपास पथकाला आढळून आले.

त्यानुसार सुनिल शिवाजी चव्हाण (वय 23 रा.मोरदरी ता. हवेली), आकाश काळुराम चव्हाण (वय 25, रा. मोरदरी, ता. हवेली), दादा बबन चव्हाण (वय 36, रा. शिंदेवाडी ता. भोर), शुभम रोहिदास भंडलकर (वय 23 रा. माहुर ता. पुरंदर),शंभु दत्तात्रय शितकल (वय 22, माहुर ता. पुरंदर) व सहिमुद्दीन सज्जाद अली साह (वय 30, रा. गुजर निंबाळकवाडी, ता हवेली, भंगार व्यावसायिक) या सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. तसेच यात अजूनही काही आरोपी सामील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.

गडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने रचला कट....... आरोपी सुनील चव्हाण याचे सिंहगडावर खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आलेले साहित्य त्याने पाहिले व त्याच्या इतर सहकाऱ्यांना 'चांगला माल' असल्याची माहिती दिली. गडावर कोणत्या वेळी कोण असतं याची खडानखडा माहिती असल्याने सुनीलने कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी चोरी करायची याचा कट रचला. एक पिकअप गाडी भाड्याने घेण्यात आली व साहित्याची चोरी करुन साडेसात लाखांचे साहित्य 30 रुपये किलो दराने केवळ पंधरा हजारांना विकण्यात आले.

रॅकेट असण्याची शक्यता....

सिंहगडावरुन चोरलेले साहित्य ज्या भंगार व्यावसायिकाने घेतले ते त्याने दुसऱ्या मोठ्या व्यावसायिकाला विकले. यामध्ये एक समीर नावाचा एजंटही होता. त्यामुळे आरोपींवर जरी यापूर्वी गुन्हे दाखल नसले तरी त्यांनी एकत्रित मिळून चोऱ्या केलेल्या असण्याची शक्यता आहे. चोरीचे हे रॅकेट उघडकीस करण्यात हवेली पोलीसांना यश येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com