#PuneCrime कोयत्याचा धाक दाखवून लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

दुचाकीस्वारास मारहाण
पाषाण परिसरात काम संपल्यानंतर हॉटेलमध्ये जेवणासाठी जात असलेल्या एका तरुणास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून मारहाण केली. पैशांची मागणी केल्यानंतर फिर्यादींनी त्यास विरोध केल्यामुळे त्यांच्या हातावर कोयत्याने वार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या स्वरूपाच्या घटना शहरामध्ये सातत्याने घडू लागल्या आहेत.

पुणे - रात्रीच्या वेळी पायी, दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून, त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे प्रकार शहरामध्ये वाढले आहेत. गेल्या आठवड्यात वारजे, वडगाव बुद्रुक व पाषाण परिसरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड व वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. 

सुनील बाबू मरगळे (वय १९, रा. मुळशी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यामध्ये सिंहगड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चिन्मय पार्डीकर (वय २१, रा. नऱ्हेगाव) याने फिर्याद दिली. पार्डीकर हा शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या मरगळे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी फिर्यादीस अडविले. नाव व पत्ता विचारून मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन खिशातील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. 

फिर्यादीने विरोध केल्यानंतर आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा ४१ हजारांचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, शुभम मल्हाडे (वय २४, रा. नऱ्हे) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तो गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मित्र अमोल मुंडे याच्यासमवेत वारजे येथील उड्डाण पुलावरून जात होता. त्या वेळी त्यांना चौघांनी अडविले. ‘आमच्याकडे काय बघत होतास’, असे म्हणून त्यांनी शुभम व अमोलला चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी घेऊन आरोपींनी पलायन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Crime Loot