Pune: अत्याचार झालेल्या मुलीची साक्ष न होताच डीएनए अहवालावरुन गुन्हा सिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्याचार

अत्याचार झालेल्या मुलीची साक्ष न होताच डीएनए अहवालावरुन गुन्हा सिद्ध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेत १७ वर्षाच्या मुलीवर आत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्याला विशेष न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटला सुरू असताना मुलीचा मृत्यू झाल्याने तिची साक्ष नोंदविता आली नाही. मात्र डीएनएच्या अहवालामध्ये संबंधित मुलीला झालेल्या बाळाचा आरोपी हा जनक पिता (बायोलाँजिकल फादर) असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याआधारे त्याला शिक्षा सुनावण्यात आली.

पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. अप्पा यशंवंत साळवे (वय ५२, रा. कुसगाव, लोणावळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. साळवे हा रेल्वेमध्ये वरीष्ठ मेकॅनिक आहे. मुलीच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याने ती आजीकडे रहात होती. आरोपी हा तेथेच रेल्वे वसाहतीमध्ये एका बंगल्यात राहत. फेब्रुवारी २०१७ मध्ये आरोपीने मुलीला हाक मारुन घरात पाणी घेऊन बोलावले व तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा: राष्ट्रीय कर परिषदेचे पुण्यात आयोजन

ही घटना कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी सावळने दिली. त्यानंतर त्याने हा प्रकार पुन्हा केला. आत्याचार केल्याच्या काही महिन्यांनंतर मुलीचे पोट दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले होते. ती गरोदर असल्याचे तपासणीत आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणावळा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक राधीका मुंडे व उपनिरीक्षक एस. जी. दरेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यानच्या काळात या मुलीने बाळाला जन्म दिला.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी, मुलगी व तिच्या बाळाचे डीएनए नमुने घेतले. त्याचा अहवाल सकारात्मक आला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. या खटल्यात लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर आणि न्यायालयीन पैरवी अल्ताफ हवालदार यांनी सरकार पक्षाला न्यायालयीन कामात मदत केली.

मुलगी व तिच्या भावाचे निधन :

अत्याचार झालेली मुलगी या प्रकरणाची महत्वाची साक्षीदार होती. मात्र तिचे व तिच्या लहान भावाचे जानेवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिची साक्ष नोंदविता आली नाही.

हेही वाचा: ST Strike : कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो

मुलीच्या मृत्युमुळे आरोपीला कोणताही फायदा देता येणार नाही. कारण उपलब्ध तोंडी व लेखी पुरावा आरोपीचा गुन्हा शाबीत होण्यासाठी पुरेसा आहे. तसेच डीएनए अहवालामध्ये आरोपी हा संबंधित बाळाचा जनक पिता असल्याचा उल्लेख आहे, असा युक्तीवाद ॲड. अगरवाल यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.

loading image
go to top