

Police successfully arrested the repeat offenders who created panic at a Pune petrol pump, tracing them through swift surveillance and a 24-hour operation.
esakal
Pune Petrol Pump Attack News Update : पुण्यातील येरवडा नगर रोड सरगम पेट्रोल पंप, गुंजन चौक येथे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी किरकोळ वादातून दोन आरोपींनी कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले होते. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती.
यामुळे घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली होती. आरोपी हे येरवडा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर जबरी चोरीसह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार शोधपथके त्वरीत रवाना करण्यात आली.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार अतुल जाधव व मुकुंद कोकणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कल्याणीनगर परिसरातील नदीपात्रात लपून बसले आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नदीपात्र परिसरात सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या वेशभूषेच्या वर्णनावरून संशयितांवर पाळत ठेवण्यात आली आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी आपली नावे कृष्णा नाईक (२५, रा. गांधीनगर, येरवडा) आणि अक्षय उर्फ आबा जमदाडे (२५, रा. गांधीनगर, येरवडा) अशी सांगितली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी येरवडा पोलिस ठाण्यात आणले असून तपास हवालदार तेजपाल जाधव करत आहेत.