जंगलात फिरल्यानंतर आठवला "क्राईम सीन' 

अनिल सावळे
शुक्रवार, 10 मार्च 2017

राजेश जाधव याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश मगर हा जेलमधून जामिनावर सुटला होता. तो बाहेर आल्यानंतर अचानक गायब झाला. कदाचित खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. तोच धागा पकडून गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. राजेशची बहीण सीमा हिने पती आणि गुन्हेगाराच्या मदतीने याच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले. 

राजेश जाधव याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आकाश मगर हा जेलमधून जामिनावर सुटला होता. तो बाहेर आल्यानंतर अचानक गायब झाला. कदाचित खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना होता. तोच धागा पकडून गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. राजेशची बहीण सीमा हिने पती आणि गुन्हेगाराच्या मदतीने याच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले. 

पिंपरीतील आकाश श्रीधर मगर हा 22 वर्षांचा तरुण. बाईकवर फिरून येतो म्हणून घराबाहेर पडला. परंतु, तो रात्री घरी परतलाच नाही. नातेवाइकांनी बरीच शोधाशोध केली. पिंपरी पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल झाली. आठ महिने उलटूनही आकाशचा ठावठिकाणा लागत नव्हता. बाईक आणि मोबाईलसह तो रहस्यमय पद्धतीने गायब झाला होता. नातेवाइकांनी तो सापडेल याची आशा सोडून दिली होती. मात्र, गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक पथक आकाशच्या अचानक गायब होण्याचे गूढ शोधण्यात व्यस्त होते. 

पोलिस हवालदार संतोष पगार यांना बेपत्ता झालेल्या आकाश मगर याचा पूर्वइतिहास माहीत होता. त्यामुळे त्याच्या गायब होण्यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावला. गुन्हे शाखेचे तत्कालीन अतिरिक्‍त आयुक्‍त सी. एच. वाकडे, सहायक आयुक्‍त राजेंद्र जोशी आणि सतीश पाटील यांनी वरिष्ठ निरीक्षक गणपत पिंगळे यांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. सहायक निरीक्षक सुनील गवळी, लक्ष्मण डेंगळे, पोलिस कर्मचारी संजय दळवी, देविदास भंडारी, अशोक आटोळे, दत्तात्रेय काटम, प्रमोद गायकवाड आणि राहुल घाडगे यांनी बारकाईने तपास सुरू केला. 

बेपत्ता झालेला आकाश हा पिंपरीतील राजेश जाधव याच्या खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो गायब झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी आकाशबाबत अधिक माहिती घेतली. तो कारागृहात असताना त्याची मैत्री आकाश खराडे नावाच्या तरुणाशी झाली होती. पण हाच खराडे मृत राजेश जाधव याच्या बहिणीचा पती होता. त्यामुळे यात नक्‍कीच काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलिसांना आला. खराडे हा पत्नीसह घर सोडून पसार झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच त्यांचा ठावठिकाणा लागला. आकाश खराडे, त्याची पत्नी आणि मृत राजेश जाधव याची बहीण सीमा खराडे यांना वेगवेगळे घेऊन कसून चौकशी केली. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पण तपासात सुनील ऊर्फ डोंगऱ्या हनुमंत राठोड याचे नाव समोर आले. तो सराईत गुन्हेगार असून एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होता. त्याला भोसरी परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवूनही डोंगऱ्या तोंड उघडत नव्हता. पोलिसांनी बहीण-भावाच्या नात्याच्या भावनिक संवेदनाचा आधार घेतला अन्‌ सीमा खराडे हिने तोंड उघडले. आयुष्यात सर्वात प्रिय असलेला तिचा भाऊ राजेश जाधव याचा आकाश मगर आणि त्याच्या साथीदारांनी किरकोळ कारणावरून दगडाने ठेचून खून केला होता. त्याचा राग सीमाच्या मनात खदखदत होता. या खुनाचा बदला घेण्याच्या विचाराने तिने अट्टल गुन्हेगार सुनील ऊर्फ डोंगऱ्या राठोड याच्याशी जवळीक साधली होती. पती आकाश खराडे कारागृहात असताना त्याने आकाश मगरसोबत जाणीवपूर्वक मैत्री केली होती. कारागृहातून बाहेर आल्यावर खराडे आणि आकाश हे दारू आणि गांजा पिण्यासाठी भेटत होते. यातूनच सीमा, डोंगऱ्या आणि खराडे यांनी कट रचला. खराडे याने 26 जुलै 2015 रोजी आकाशला दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. त्याच्या मोटरसायकलवर पिंपरीत जाऊन त्यांनी दारू पिली. त्यानंतर दारू पिण्यासाठी आळंदीकडे नेले. सीमा आणि डोंगऱ्या हे दोघेजण प्लॅननुसार आळंदीला पोचले होते. खराडेने आकाशला आळंदी-चाकण रस्त्यावरील रोटाई माता मंदिराच्या बाजूला जंगलात नेले. तेथे ठरल्यानुसार क्रूर डोंगऱ्या कुऱ्हाड घेऊन पोचला. वाळलेले लाकूड तोडावे तसे डोंगऱ्याने आकाशवर वार करून दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर दगडी बांधाच्या खाली मृतदेह लपविल्याचे सीमाने तपासात सांगितले आणि मिसिंगचे गूढ उलगडले. 

परंतु, पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. पोलिसांना या गुन्ह्यात मृतदेह मिळणे आवश्‍यक होते. दरोडा प्रतिबंधक पथकाचे तपास पथक मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण डोंगऱ्या आणि खराडे या दोघांनी दाखवलेल्या जागेवर काहीच मिळले नाही. जंगलात फिरल्यानंतर तेथे बरेच दगडी बांध आढळून आले. त्यामुळे पोलिस हतबल झाले होते. यानंतर एपीआय गवळी, कर्मचारी भंडारी, काटम यांनी खराडेला विश्वासात घेतले. त्याला तो "क्राइम सीन' आठवावा म्हणून खराडेला मोटरसायकलवर बसवून पुन्हा आळंदी ते चाकण मार्गावरून जंगलात आणले. तेथून एका दगडी बांधावर पोचल्यानंतर तपास पथकाला मृतदेह लपविल्याची जागा मिळाली आणि अहोरात्र सुरू असलेल्या तपासचक्राचे काटे थांबले. आरोपी डोंगऱ्या, खराडे यांनी सीमाच्या भावाच्या खुनाचा सूड घेण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनाला वाचा फुटली. एका मिसिंग ते मर्डर अशा तपासाचा शेवट झाला.

Web Title: pune crime story