esakal | Daund: युवकांनी डिझेल चोरी करणारी टोळी पकडून दिली पोलिसांच्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांनी डिझेल चोरी करणारी टोळी पकडून दिली पोलिसांच्या ताब्यात

दौंड : युवकांनी डिझेल चोरी करणारी टोळी पकडून दिली पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील युवकांनी धाडसाने आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. या युवकांचे परिसरातून कौतुक होत आहे. यवत पोलिसांनी या घटनेचे क्रेडिट घेण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत मोठा बनाव केला आहे. यातून यवत पोलिसांचा प्रसिद्धीचा हव्यास पुन्हा एकदा उघड झाला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, सचिन बोत्रे (रा. पारगाव) यांचा मालवाहतूक करणारा ट्रक २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री पारगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप येथे डिझेल भरून उभा होता. पहाटे दोनच्या सुमारास एक आयशर कंपनीचा टेम्पो ट्रकशेजारी येऊन उभा राहिला. टेंपोमधील चोरट्यांनी ट्रकमधील ३९ हजार रुपये किमतीचे ४०० लिटर डिझेल चोरून नेले. ही घटना पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. बोत्रे यांनी डिझेल चोरीची तक्रार यवत पोलिस स्टेशनमध्ये दिली.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

सात ऑक्टोबरला हा संशयित टेम्पो पारगाव चौकातून जाताना सचिन बोत्रे यांना दिसला असता त्यांनी त्वरित पोलिस मित्र वैभव बोत्रे यांना सांगितले. बोत्रे यांनी त्वरित केडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांना माहिती देत लगेच टेम्पोचा पाठलाग सुरू केला. टेम्पो ड्रायव्हरला संशय आल्याने त्यांना बोत्रे यांच्या वाहनावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोत्रे यांनी धाडसाने टेम्पो अडवण्यात यश मिळवले.

टेम्पो थांबताच त्यातील संशयित उड्या टाकून उसाच्या शेतात फरार झाले. टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्याकरिता घेऊन जात असताना टेम्पोचा पाठलाग एक आलिशान मोटार करत असल्याचे बोत्रे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित त्याची कल्पना पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांना दिली. गंपले त्यांनी घटनेच्या दिशेने पोलिस पाठवले. पाठलाग करणारी आलिशान मोटार पारगाव- केडगाव रस्त्यावरील जोगेश्वरी मिसळ या हॉटेलजवळ स्थानिकांनी अडवली. त्यावेळी गाडीत एका महिलेसह चौघे जण होते.

हेही वाचा: औरंगाबादेत बंधाऱ्यात कार बुडाली,एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

त्यानंतर पोलिस येथे आले. मोटारीतील संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आंतरराज्य डिझेल चोरीमध्ये ते सहभागी असल्याचे आढळले. या कामी पारगाव येथील पोलिस मित्र वैभव बोत्रे, राहुल टिळेकर, नीलेश धुमाळ, विक्रम शिंदे, प्रशांत शिंदे, सागर बोत्रे यांनी अतिशय धाडसाने आंतरराज्य टोळी पकडून देण्यात मोलाचे सहकार्य केले. पोलिसांनी मात्र पत्रकार परिषदेत म्होरक्यास केले जेरबंद, पोलिसी खाक्या, पोपटासारखा बोलू लागला, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार, रेकॅार्डवरील गुन्हेगार, पथक, अनेक गुन्हे उघडकीस येणार, असे गोड गोड शब्द प्रयोग शिताफीने वापरले आहेत. या शब्द प्रयोगांचा आणि कारवाईचा दुरान्वयेही संबंध नसल्याची चर्चा परिसरात होत आहे.

मोटारीतील तीन व्यक्ती नेमक्या कोण?

स्थानिकांनी अडविलेल्या आलिशान गाडीत एका महिलेसह चौघेजण होते. पोलिसांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व फोटो सेशनमध्ये राजवीर गजराजसिंग मल्होत्रा हा एकच संशयित अटकेत दाखविला आहे. इतर तिघेजण कुठे गेले असा प्रश्न पारगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पत्रकार परिषदेत पोलिसांनी स्थानिक युवकांच्या सहकार्याचा उल्लेख केला नाही. मोटारीतील महिला मल्होत्रा याची पत्नी तर दोन युवक त्याचे मुलगे असल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे, असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

loading image
go to top