esakal | पुण्यात नियम धाब्यावर बसवून सुरू होते ब्युटी सलून; डेक्कन पोलिसांची कारवाई

बोलून बातमी शोधा

पुण्यात नियम धाब्यावर बसवून सुरू होते ब्युटी सलून; डेक्कन पोलिसांची कारवाई
पुण्यात नियम धाब्यावर बसवून सुरू होते ब्युटी सलून; डेक्कन पोलिसांची कारवाई
sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार एकीकडे सर्वसामान्य व्यावसायिकांची केशकर्तनालयांची दुकाने बंद असताना, दुसरीकडे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून ब्युटी सलून सुरू ठेवणाऱ्या ब्युटी सेंटरवर डेक्कन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भांडारकर रस्त्यावरील "व्हि.एल.सी.सी वेलनेस ऍन्ड ब्युटी सेंटर' पोलिसांनी कारवाई केली आहे.

पुण्यासह राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यामध्ये केशकर्तनालयांचाही (कटींग सलून) समावेश होता. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत संबंधित छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. काही ठिकाणी व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याच्याही घटना ताज्या आहेत. असे असूनही व्यावसायिकांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध न जाता दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य दिले. तर दुसरीकडे भांडारकर रस्त्यावरील "व्हि.एल.सी.सी वेलनेस ऍन्ड ब्युटी सेंटर' हे ब्युटी सलून मात्र सुरू होते.

हेही वाचा: 'आम्ही निधी देऊ, पण रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन द्या'; पुणे महापौरांची मागणी

याबाबतची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांना माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत कुदळे, संदिप जाधव, किशोर शिंदे, पोलिस कर्मचारी स्मिता पवार यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी संबंधीत ब्युटी सलून हे सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधीत ठिकाणी ग्राहकांची नोंदणी करून त्यांना सेवा पुरविण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, 269, 270 व 34, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (बी)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे व परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली.

"व्हि.एल.सी.सी'च्या मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसारच ब्युटी सलून सुरू

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सलून बंद ठेवण्याचे आदेश असतानाही संबंधीत ब्युटी सलून का सुरू ठेवण्यात आले, असा प्रश्‍न पोलिसांनी ब्युटी सलूनच्या स्लिमींग हेड मॅनेजरला विचारला. त्यावेळी "व्हि.एल.सी.सी'चे मुख्य कार्यालय तसेच त्यांच्या बिझनेस ऑफीसर यांनीच सलून सुरू ठेवण्यास सांगितल्याचे स्लिमींग हेड मॅनेजरने स्पष्ट केले.