Pune | जिल्ह्यात ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-ZP
पुणे जिल्ह्यात ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू

पुणे जिल्ह्यात ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हेही वाचा: वालचंदनगर : महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाल मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन हे प्रमाण आणखी कमी करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार मिळवून देणे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करत, लिंग गुणोत्तर वाढीस हातभार लावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी या अभियानाचा सुरवात केली जाणार आहे. ते २४ डिसेंबरपर्यंत राबविले जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बालविकासाचे प्रयत्न अशा दोन्ही बाबींची सांगड या अभियानात घालण्यात येणार आहे. यासाठी बालकांच्या वेशभूषेद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती देण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गर्भवती आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे आणि महिलांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: अमेरिकेत होणाऱ्या "रॅम' या स्पर्धेमध्ये हडपसरच्या दशरथ जाधव यांचा प्रवेश निश्चित

या अभियानाच्या माध्यमातून अतितीव्र (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका या बालमृत्यू झालेल्या घरी भेटी देऊन कारणे जाणून घेतील. त्यांच्या अहवालानुसार पुढील आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. कुपोषणामुळे दुर्धर आजार झालेल्या बालकांना विशेष शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील बालोपचार केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

अभियान कालावधीतील काही उपक्रम

- गर्भवतीस १ हजार दिवस बालकांचे उपक्रमाबाबत माहिती देणे.

- गर्भवतींना पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन करणे.

- स्तनदा मातांना बाळासाठी मातेच्या दुधाचे महत्त्व समजावून सांगणे.

- माहेरवाशीण गर्भवतींना व्हीडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करणे.

- शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची १०० टक्के तपासणी करणे.

- तपासणीच्यावेळी बालकांना वजनवाढीची व जंतनाशक औषधे देणे.

- विशेष शिबिरांचे आयोजन करणे.

प्रजासत्ताकदिनी गावांचा गौरव

आपापल्या गावातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायती, आपापल्या हद्दीतील बालमृत्यू कमी करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६ जानेवारी) जिल्हा परिषदेच्यावतीने खास गौरव करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. बालकांना वेळीच पूरक आहार आणि योग्य उपचार मिळाल्यास बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी अशा सर्वांच्या प्रयत्नांतून बालकांना मिळणारी ‘बालसंजीवनी’ ही सुदृढ पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

loading image
go to top