Pune News : वार्षिक विकास आराखड्यात ऊर्जा, पर्यटन, रोजगारावर भर

पुणे जिल्ह्याच्या ११२९ कोटींच्या आराखड्याला पालकमंत्र्यांची मंजुरी.
Pune City
Pune Citysakal

पुणे - पुणे जिल्ह्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या (सन २०२४-२०२५) वार्षिक विकास आराखड्यात पारंपारिक व अपारंपरिक ऊर्जा विकास, पर्यटन विकास, महिला व बालकांचे सशक्तीकरण, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती, गतिमान प्रशासन, शिक्षण, आरोग्य व रस्ते विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील संभाव्य विकास कामांच्या १ हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीने बुधवारी (ता.१०) मंजुरी दिली आहे.

या प्रारूप वार्षिक आराखड्यात वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेंतर्गत १३५ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे सर्व दूरदृष्य प्रणालीद्वारे, पालकमंत्री पवार यांच्या समिती कक्षातून आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आमदार उमा खापरे, दत्तात्रेय भरणे, अशोक पवार, ॲड.राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत प्रस्तावित तरतूद (रुपयांत)

- ग्रामीण विकास, जनसुविधा --- १२५ कोटी

- नागरी सुविधांचे बळकटीकरण --- १४१ कोटी

- आरोग्य सुविधा --- ५१ कोटी १६ लाख

- रस्ते विकास --- १०५ कोटी

- अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास --- ९५ कोटी

- पर्यटन विकास --- ५३ कोटी ४४ लाख

- हरित महाराष्ट्र --- ६२ कोटी

- महिला व बालकांचे सशक्तीकरण --- २८ कोटी ४४ लाख

- गतिमान प्रशासन --- ७५ कोटी ८४ लाख

- कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती --- ६ कोटी ६५ लाख

- शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधा --- ४७ कोटी ४० लाख

- क्रीडा कलागुणांचा विकास --- ३० कोटी २० लाख

- नावीन्यपूर्ण योजना --- ४१ कोटी ८६ लाख

चालू वर्षात आजअखेर ८३.७२ टक्के निधी खर्च

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या चालू आर्थिक वर्षातील (सन २०२३-२४) जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण योजनेअंतर्गत आजअखेरपर्यंत (ता.१०) एकूण ५९० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. निधी खर्चाचे हे प्रमाण वार्षिक आराखड्यातील एकूण प्रस्तावित निधीच्या प्रमाणात ८३.७२ टक्के इतके आहे. यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरित निधीच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १२.८० टक्के आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ५२.९५ टक्के निधी खर्च झाला आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com