लिपिक भरतीप्रक्रियेत गोलमाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

भवानीनगर - न्यायालयाच्या स्थगितीनंतर पुन्हा सुरळीत सुरू झालेल्या पुणे जिल्हा बॅंकेच्या ३९३ लेखनिकांच्या भरतीप्रक्रियेत आता संचालकांच्या पत्राने बाँबगोळा पडला आहे. शनिवारपासून (ता. २१) होत असलेल्या भरतीप्रक्रियेत अधिकाऱ्यांनी गोलमाल केल्याचा संशय व्यक्त करीत तब्बल १० संचालकांनी ही प्रक्रिया थांबवावी व भविष्यात काही चौकशी झाल्यास आपणास जबाबदार धरू नये, असे लेखी पत्र बॅंक प्रशासनास दिले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची लिपिक पदाची भरतीप्रक्रिया सध्या सुरू आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर न्यायालयीन आदेशावरून ही प्रक्रिया थांबली होती. तब्बल ३९३ जागांची ही भरतीप्रक्रिया असून १६ डिसेंबर २०१७ रोजी उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, त्याची केवळ मुलाखत राहिली असून तीदेखील २१ जुलै ते २४ जुलैदरम्यान होणार आहे. एकीकडे आपल्या या पदाची पारदर्शक भरतीप्रक्रिया कशी होते, याकडे उमेदवारांचे डोळे लागलेले असतानाच या भरतीप्रक्रियेत सारे काही आलबेल नसल्याचे खुद्द संचालकांनीच पत्राद्वारे उघड केले आहे. 

बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांनी एक पत्र जिल्हा बॅंकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले आहे. यावर बॅंकेच्या दहा संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आणखीही संचालकांच्या स्वाक्षऱ्या झाल्या असत्या, परंतु काही संचालक पंढरपूरला गेल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असे दारवटकर म्हणाले. 
दरम्यान, दारवटकर यांनी बॅंकेस दिलेल्या पत्राच्या प्रतीवर उपाध्यक्षा अर्चना घारे यांच्यासह दहा संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संचालकांपैकी घारे यांच्याशी संपर्क झाला, त्यांनीही यास दुजोरा देत एकमत झाल्याने आम्ही सर्व संचालकांनी यावर स्वाक्षऱ्या करून हे पत्र दिल्याचे सांगितले. 

या भरतीप्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केल्याचा संशय आहे. सध्याची भरतीप्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असून त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया थांबणे जरुरीचे आहे, तरीही ती झालीच, तर यात उद्या काही चौकशी झाल्यास आम्हाला दोषी धरू नये, असे पत्र आम्ही बॅंकेच्या प्रशासनास दिले आहे.
- रेवणनाथ दारवटकर, संचालक, जिल्हा बँक

Web Title: pune district bank clark recruitment process issue