esakal | पन्नाशीच्या आतील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्याला लागणार लशीचे किमान ५२ लाख डोस

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
पन्नाशीच्या आतील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्याला लागणार लशीचे किमान ५२ लाख डोस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मिळून वयाच्या पन्नाशीच्या आतील ५२ लाख १५ हजार ३०९ मतदार आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी या मतदार यादीचा आधार घेतल्यास शहर व जिल्ह्याला किमान लसीकरणासाठी किमान ५२ लाख डोस लागणार आहेत.

सध्या मतदारयादीत नाव नसलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचा आकडा निश्र्चित नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तरी या लसीकरणासाठी मतदार यादीचा आधार जिल्हा प्रशासन घेणार असल्याचे विश्र्वसनीय सूत्रांकडून गुरुवारी (ता.२२) सांगण्यात आले.

येत्या महाराष्ट्रदिनापासून (ता.१ मे) किमान अठरा वर्षे व त्यापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे सरसकट कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे मतदार नोंदणीनुसार ही संख्या निश्चित आहे. मात्र यामध्ये मतदार नोंदणी न केलेले आणि नव्याने मतदार नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे.

हेही वाचा: पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये पुणे शहरातील आठ, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

वयोगटानुसार एकूण मतदार

- १८ व १९ वर्षं ---- ९७ हजार १६१.

- २० ते २९ वर्ष ---- १३ लाख १६ हजार ७७४.

- ३० ते ३९ वर्ष ---- २० लाख ३६ हजार ५५७.

- ४० ते ४९ वर्ष ---- १७ लाख ६४ हजार ८१७.