Pune Rains: संततधार पावसामुळे ग्राहकांची उडाली धांदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दिवाळी खरेदीच्या शेवटच्या रविवारी संततधार पडणाऱ्या पावसाने ग्राहकांची धांदल उडवली. बहुतांश पुणेकरांचे दिवाळीसाठी कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या खरेदीचे नियोजन पावसामुळे कोलमडले.

पुणे - दिवाळी खरेदीच्या शेवटच्या रविवारी संततधार पडणाऱ्या पावसाने ग्राहकांची धांदल उडवली. बहुतांश पुणेकरांचे दिवाळीसाठी कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या खरेदीचे नियोजन पावसामुळे कोलमडले. पाऊस, वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवर झालेली चिकचीक अशा पावसाळी वातावरणात पुणेकर दिवाळीची खरेदी करत असल्याचे चित्र रविवारी दिसत होते.

गेल्या रविवारीही पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे खरेदीचा मुहूर्त चुकला होता. या रविवारीही पावसाच्या संततधार सरी पडल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी शेवटचा रविवारदेखील मिळणार नाही, अशी चर्चा घराघरांत रंगत होती; पण काही उत्साही महिला रेनकोट घालून खरेदीला बाहेर पडल्या आणि त्यांनी थेट रविवार पेठ गाठली. शेवटचा रविवार असूनही या पेठांमध्ये गर्दी मात्र खूप कमी होती, असे स्पष्ट जाणवत होते. चित्रा गौरीधर म्हणाल्या, ‘‘आज दुपारपर्यंत पाऊस उघडण्याची वाट पाहिली पण, तो काही थांबण्याचे नाव घेईना. मग, रेनकोट घातला आणि  खरेदीसाठी रविवार पेठेत आलो.’’ शहरात दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुणेकरांनी खरेदीसाठी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरात गर्दी केली होती; पण सायंकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाल्यानंतर ही गर्दी ओसरू लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Diwali shopping in Rain

टॅग्स
टॉपिकस