Pune News : पुण्यातील गटारे तुंबली, पण स्वच्छताच नाही

पावसाचे पाण्यासोबत वाहून आलेला कचरा पावसाळी गटाराच्या चेंबरच्या झाकणावर अडकत आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही.
Drainage Line
Drainage LineSakal

पुणे - पावसाचे पाण्यासोबत वाहून आलेला कचरा पावसाळी गटाराच्या चेंबरच्या झाकणावर अडकत आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्याही पावसाळी गटार आणि चेंबरची वारंवार स्वच्छता करून घेतली जाईल अशी घोषणा प्रशासनाने केली होती.

मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरात पाणी तुंबत असल्याचे गेल्या आठवड्यातील पावसामुळे स्पष्ट झाले. अधिकारी ठेकेदारावर मेहेरबानी दाखवत असल्याने त्याचा फटका पुणेकरांना बसत आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि पावसाळी गटारांची, चेंबरची स्वच्छता केली जाते. यासाठी दोन्ही कामांसाठी १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र निविदा काढल्या जातात. यंदाच्या वर्षी १८० किलोमीटर लांबीचे नाले आणि २६० किलोमीटरच्या पावसाळी गटारे, ५८ हजार ८५९ चेंबरची स्वच्छता करण्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नाले सफाई आणि गटारांची स्वच्छता करताना कचरा बाहेर काढणे, पाणी वाहून जाण्यास अडथळा होणार नाही याची काळजी घेणे अशी कामे केली जातात. पण पावसामध्ये रस्त्यावरील कचरा वाहून आल्यानंतर तो पावसाळी चेंबरच्या झाकणावर अडकतो. त्यामुळे पाणी चेंबरमध्ये जात नाही, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. त्याचा फटका नागरिकांना बसतो. गेल्या काही वर्षांपासून हा अनुभव वारंवार येत आहे.

यंदाच्या वर्षी पावसाळी गटारांची स्वच्छता एकदा नाही तर वारंवार केली जाईल असे महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट केले होते. जुलै महिन्यात पाऊस पडला असला तरी सलग मुसळधार पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाणी तुंबले नाही.

पण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले, त्यावेळी चेंबरला कचरा अडकल्याने पाणी तुंबत असल्याचे स्पष्ट झाले.

कामाची मुदत सहा महिने पण काम एकदाच

पावसाळी गटाराच्या स्वच्छतेच्या कामाची मुदत सहा महिने तर काही वेळा एका वर्षाची असते. त्यामुळे ठेकेदाराने वारंवार स्वच्छता करणे अनिवार्य आहे. पण ठेकेदाराकडून केवळ पावसाळ्यापूर्वी एकदाच स्वच्छता केली जाते.

गेल्या आठवड्यात पाणी तुंबल्यानंतरही चेंबरच्या झाकणावरील कचरा काढण्याचे काम सुरु झालेले नाही. हे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि मलःनिसारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून करून घेणे आवश्‍यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गेल्या दोन वर्षात शहरात ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने शहर तुंबल्याचा अनुभव आला आहे. यातून धडा घेत प्रशासनाने पावसाळी गटार व चेंबरची स्वच्छता न केल्यास आणि जोरदार पाऊस झाला तर यंदाही पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून ही कामे पुन्हा एकदा करून घेणे आवश्‍यक आहे.’’

- अविनाश खंडारे, नागरिक

‘पावसाळ्यामध्ये पावसाळी गटारांची, चेंबरची स्वच्छता करणे आवश्‍यक आहे. ही कामे होत नसतील तर स्वच्छता करण्याचे आदेश देऊन यात सुधारणा केली जाईल. पावसाचे पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

  • नाल्यांची लांबी - १८० किलोमीटर

  • पावसाळी गटारांची लांबी - २६० किलोमीटर

  • चेंबरची संख्या - ५८८५९

  • स्वच्छतेसाठीचा खर्च - सुमारे २० कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com