शिक्षक प्रशिक्षणे सक्षमीकरणासाठी की फक्त निधी खर्च करण्यासाठी?

संतोष आटोळे
मंगळवार, 27 मार्च 2018

पुणे जिल्ह्यासाठी 22 लाख 99 हजाराचा निधी

पुणे जिल्ह्यासाठी 22 लाख 99 हजाराचा निधी

शिर्सुफळ - शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तालुकास्तरीय शैक्षणिक मेळाव्यांच्या आयोजनासाठी शासनाकडून पुणे जिल्ह्यासाठी सुमारे 23 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. मात्र आर्थिक व शैक्षणिक वर्षाच्या शेवटी या प्रशिक्षणासाठी निधी मंजूर करण्यात येऊन घाईघाईने प्रशिक्षणे उरकण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता आर्थिक वर्षाचे काही दिवस शिल्लक असताना 31 मार्चपूर्वीच प्रशिक्षणे आयोजित करून निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाचा आटापिटा सुरु आहे. त्यामुळे ही प्रशिक्षणे सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी की फक्त निधी खर्च करण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती कार्यरत असणे आवश्यक आहे. सन 2017-2018 शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्याचा व समित्या सक्षमीकरण करण्याचा शासनाचा उद्देश चांगला आहे. शासनाने केंद्रस्तर व शाळास्तरावरील प्रशिक्षणासाठी यापूर्वीच तब्बल 48 लाख रुपये अऩुदान पुणे जिल्ह्यासाठी तालुकानिहाय उपलब्ध करून दिले होते. तोच निधी खर्चाबाबत अद्याप अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती असताना आता तिस-या टप्प्यातील शैक्षणिक मेळाव्यांसाठी 22 लाख 99 हजार एवढी तरतुद पुणे जिल्ह्यासाठी तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदर मेळावे हे 31 मार्च पूर्वी घेवुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेच्या माध्यमातुन 20 मार्चच्या पत्रानुसार देण्यात आल्या आहेत.

हे मेळावे घेत असताना तालुक्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीचे 6 सदस्य, संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, सर्व स्तरावरील पर्यवेक्षीय यंत्रणा, तालुक्यातील मागील दोन तीन वर्षात सर्वाधिक पट वाढलेल्या शाळांचे क्रियाशील शिक्षक व अन्य मदतगार व्यक्ती ज्यांनी अशा शाळांना भरीव मदत केली आहे त्यांना बोलविण्यात यावे. गटसाधन केंद्राने शासनाद्वारे सुरू असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, भाषा, गणित, स्पोकन इंग्रजी, शाळा सिध्दी, बालरक्षक, शिक्षणाची वारी, अध्ययन निष्पती इत्यादीवर आधारित शैक्षणिक स्टॉलची उभारणी करावी. तसेच प्रगत शाळा, मोठ्या प्रमाणात पट वाढलेल्या शाळा, डिजीटल शाळा, भरीव लोकसहभाग मिळवणारी शाळा, 100 टक्के स्थलांतरण थांबवलेली शाळा, शून्य गळती व शालाबाह्य मुले विरहीत शाळा, अनियमित मुलांना नियमित करून त्यांची उपस्थिती वाढ करणारी शाळा, शाळा शैक्षणिक विकास आराखडा निर्मिती करून त्याप्रमाणे यशस्वी अंमलबजावणी करणारी शाळा यांची माहिती यांचे सादरीकरण व सदर मेळाव्याचे शगुन पोर्टलसाठी केस स्टडी, व्हिडीओ तयार करण्यात यावेत. याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

प्रशिक्षणाच्या योग्य अंमलबजावणीची गरज ..
शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी शाळा भेट व केंद्रस्तर शिक्षण परिषद असे दोन टप्पे प्रशिक्षणासाठी राबविण्यात आले. त्यासाठी शासनाने 47 लाख 400 रूपये एवढी तरतुद उपलब्ध करून दिली होती. आता तालुकास्तरावर सदस्यांच्या शैक्षणिक मेळाव्यासाठी 22 लाख 99 हजार रुपये पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र ही प्रशिक्षणे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस आयोजित करावयास हवी. या प्रशिक्षणाच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे. तसेच निधीचा योग्य पध्दतीने वापर होणे आवश्यक आहे. 
दत्तात्रय वाळुंज (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ) 

तालुकास्तरीय शैक्षणिक मेळावा अनुदान वितरण

तालुक्याचे नाव वर्ग केलेली रक्कम
आंबेगाव 1 लाख 70 हजार
बारामती 1 लाख 70 हजार
भोर 1 लाख 67 हजार
दौंड 1लाख 70 हजार 
हवेली 1 लाख 38 हजार 
इंदापुर 2 लाख
जुन्नर 2 लाख
खेड 2 लाख 30 हजार
मावळ 1 लाख 80 हजार
मुळशी 1 लाख 32 हजार
पुरंदर 1 लाख 35 हजार 
शिरूर 2 लाख 
वेल्हा 87 हजार
आकुर्डी 65 हजार 
पिंपरी 55 हजार
एकूण 22 लाख 99 हजार 

 

Web Title: pune education teachers training program allotted money