लाख चुका असतील केल्या...आता सुधारू!; पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेला हवा ‘ट्रिपल बूस्टर’

लाख चुका असतील केल्या...आता सुधारू!; पुण्याच्या आरोग्यव्यवस्थेला हवा ‘ट्रिपल बूस्टर’

पुणे - संसर्गजन्य रोगाच्या साथीत ज्या ज्या वेळी पुणे उद्रेकाने हादरले, त्यानंतरच्या नव्या वर्षात पुण्याने कात टाकली. पुण्याने विकासाची नवी वाट धरली. शहराचा २५० वर्षांचा इतिहास हेच सांगतो. त्यामुळे नवीन वर्षात आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याचे आव्हान पुण्यासमोर आहे. मात्र, त्याच वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून साथरोग नियंत्रित करण्याची संधीही पुण्याला मिळाली आहे.

राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण नऊ मार्चला पुण्यात आढळला. या साथरोगाच्या उद्रेकातून पुण्यातील आरोग्याचे मूलभूत प्रश्‍न ठळकपणे पुढे आले. हे प्रश्‍न आता तातडीने तडीस न्यावे लागतील. हे फक्त सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातच नाही, तर ते वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींबद्दलही तितकेच काटेकोरपणे नियोजन करावे लागेल.

सरकारी रुग्णालयात हवी  ‘टर्शरी केअर’
पुण्यात महापालिकेचे डॉ. नायडू आणि ससून ही दोन रुग्णालये वगळता साथरोगात उपयुक्त ठरेल असे एकही रुग्णालय नसल्याचे कटू वास्तव कोरोनाने समोर आले. त्यातही जोखमीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान, अतिदक्षता विभागाने (आयसीयू) सुसज्ज रुग्णालयांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे परवडत नसतानाही सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागला. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये आणि ससूनच्या धर्तीवर आणखी रुग्णालयांची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता गुंतागुंतीच्या उपचारासाठी अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्‍टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असणाऱ्या ‘टर्शरी केअर’च्या सरकारी रुग्णालयांची संख्या वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

आरोग्यसेवा हवी तिपटीने
पुण्यातील आरोग्यसेवेचा पाया किती भुसभुशीत आहे, हे कोरोनाने ठळकपणे दाखवून दिले. आता नव्या वर्षात आरोग्य सुविधा तीन पटीने वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यांमध्ये पुण्यातील सर्व रुग्णालयांच्या खाटा भरल्या. अत्यवस्थ रुग्णाला दाखल करण्यासाठी खाटही मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्यसेवेचा विस्तारण्यासाठी मोठा अवकाश असल्याचे दिसते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भविष्यातील साथींची तयारी
भविष्यातही कोरोनासारख्याच वेगवेगळ्या विषाणूंच्या साथीचा उद्रेक होईल, असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध, अचूक निदान आणि प्रभावी उपचाराची शाश्‍वत व्यवस्था उभी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांपुढे आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाप्रमाणे संसर्गजन्य रुग्णालयांची उभारणी करण्यावर भर दिला पाहिजे. सुपरस्पेशालिस्ट डॉक्‍टरांची संख्या खूप कमी असल्याचे या उद्रेकात अधोरेखित झाले. व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णाला जीवदान देण्यासाठी एकेक डॉक्‍टर दिवसाचे चोवीस तास झटत होते. तरीही सर्व रुग्णांना वेळेत प्रभावी उपचार देण्यासाठी डॉक्‍टर कमी पडले. त्यामुळे, डॉक्‍टरांची संख्या प्रयत्नपूर्वक वाढवावी लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेपासून त्याचा विचार करण्याची गरज आहे. शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, सिटी स्कॅन अशा प्रत्येक ठिकाणी काम करण्यासाठी वैद्यक क्षेत्रासाठी पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्याची गरज आहे.

अद्ययावत प्रयोगशाळा
कोरोनाचे निदान करण्यासाठी ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था’ (एनआयव्ही) वगळता इतर कोणतीही सक्षम प्रयोगशाळा नव्हती. त्यानंतर आतापर्यंत या प्रयोगशाळांची संख्या दोनशेच्या वर वाढविण्यात यश आले. पण, त्या फक्त कोरोना निदानाच्या दृष्टीने वाढविल्या आहेत. ब्रिटनमध्ये बदल झालेल्या कोरोना विषाणूंची जनुकीय रचना अभ्यासण्यासाठी पुन्हा देशात फक्त सहाच संस्था आहेत. भविष्यात अशा पद्धतीच्या अद्ययावत प्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले पाहिजे. त्यासाठी आधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उभारण्याची गरज आहे.

पुण्यासाठी नवीन वर्षात काय महत्त्वाचे?

  • कोरोनाच्या लसीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारणे.
  • २०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आरोग्यावर अवघा चार टक्के खर्च झाला. या तरतुदीत भरीव वाढ आवश्‍यक.
  • महापालिकेची रुग्णालये वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करणे.
  • व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडची संख्या वाढविणे.
  • वैद्यक क्षेत्रासाठी पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणे.
  • वैद्यकीय महाविद्यालय तातडीने पूर्णत्वास नेणे.
  • ससूनची अकरा मजली इमारत पूर्ण क्षमतेने वापर करणे.

प्रशासकीय यंत्रणेसाठी भारतीय प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अशी व्यवस्था पूर्वापार चालत आली आहे. त्यात आता भारतीय वैद्यक सेवेचा (आयएमएस) समावेश करण्याची वेळ आली आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, 
महाराष्ट्र राज्य शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com