esakal | पुणे : तीस वाहनतळांसाठी फक्त पाच ठेकेदार I Vehicle Contractors
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Parking

पुणे : तीस वाहनतळांसाठी फक्त पाच ठेकेदार

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - महापालिकेच्या ३० वाहनतळांचे व्यवस्थापन करताना प्रशासनाचे नियंत्रण राहत नसल्याने ठेकेदारांची अरेरावी वाढून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आता या वाहनतळाच्या कामात सुधारणा करण्यासाठी ३० ऐवजी पाच ठेकेदार नेमून कामकाज केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होऊन प्रशासनाची डोकेदुखी कमी होणार आहे.

शहरात वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झालेला असताना आता पार्किंगची कमतरताही निर्माण झाली आहे. महापालिकेने शहरात ३० वाहनतळ उभारले आहेत. मात्र नागरिकांना तेथे चांगल्या पद्धतीने सेवा मिळत नसल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. नागरिकांची गैरसोय होत असताना ३० ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याचे शुल्क वसूल करणे, पाठपुरावा करणे यासह इतर कामे करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी वाहतूक नियोजन विभागाने ३० वाहनतळासाठी एकच निविदा काढण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रतिवर्ष ६ कोटी ५ लाख ३५ हजार इतके भाडे निश्‍चित केले होते. पण या निविदेस प्रतिसाद मिळाला नसल्याने पाच निविदा काढल्या जाणार आहेत. तसेच नियम व अटींमध्ये बदल करून थकलेले भाडे वसूल करण्यासाठी चार महिन्यांचे भाडे बँक गॅरंटी म्हणून घेतले जाणार आहे.

हेही वाचा: बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

संगनमताला ब्रेक लागणार

वाहनतळासाठी तीन वर्षांची निविदा काढली असून, प्रत्येक वर्षी किमान ६ कोटी ५ लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदाराने नॅशनल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून एनएसीएच फॉर्म भरून त्याची प्रत विभागाकडे सादर केल्यानंतर वर्कऑर्डर दिली जाणार आहे. त्यामुळे निविदा मान्य झाल्याचे कळविल्यानंतर आठ दिवसांत ही प्रक्रिया न केल्यास वार्षिक भाड्याच्या १० टक्के अनामत रक्कम व वार्षिक भाड्याचा रकमेचा १० टक्के भाग जप्त केला जाणार आहे. ही अट टाकल्याने ठेकेदारांमधील संगनमत टाळून महापालिकेचे नुकसान करण्याचा प्रकार टळणार आहे.

वाहनतळ व्यवस्थापन करताना त्यात सुधारणा व्हावी, समन्वय ठेवता यावा, यासाठी पाच झोन करून त्यानुसार निविदा काढली आहे. यासाठी सध्या सुरू असलेल्या निविदा रद्द केल्या जाणार आहेत. महापालिकेचे नुकसान टळावे, थकबाकी वसूल करता यावी, ठेकेदारांची मिळकत व इतर सर्व माहिती पालिकेकडे असावी यादृष्टीने नियम व अटी तयार केल्या आहेत.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

वाहनतळ निविदेसाठीचे पाच विभाग

विभाग संख्या निविदा रक्कम

अ ६ १,७२,९६, ४०७

ब ६ १,०८,९८,२९४

क १० ७२,००,३०१

ड २ १,१२,२६,०८६

इ ६ १,३८,१५,२३०

loading image
go to top