Pune: पर्यटकांची पावले पुन्हा गडकिल्ल्यांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांची पावले पुन्हा गडकिल्ल्यांकडे

पर्यटकांची पावले पुन्हा गडकिल्ल्यांकडे

पुणे : थंडीची चाहूल लागली असताना शहराकडील मंडळी आता ट्रेकिंगसाठी घरा बाहेर पडत आहेत. दिवाळीमुळे असलेल्या सुट्ट्या आणि त्यात कोरोनामुळे भटकंतीत आलेल्या मोठ्या ब्रेकला कंटाळून गड किल्ले मर करण्याकडे तरुणांची पावले पुन्हा वळू लागली आहेत. यासाठी सह्याद्रीच्या नावाजलेल्या किल्ल्यांना भेट देत आहे. त्यामुळे साहसी पर्यटनाला असलेली पर्यटकांची पसंती वाढू लागल्याचे दिसते.

याबाबत ज्येष्ठ गिर्यारोहक व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले, गेल्या वर्षी गिर्यारोहण व पर्यटन बंद होते. तसेच अनलॉकनंतरही गिर्यारोहणासाठी वनविभागाची परवानगी घेणे आवश्‍यक होते. या सर्व गोष्टींमुळे अनेकांना इच्छा असूनही घरीच राहावे लागले. दरम्यान आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून राज्य सरकारने देखील हळू हळू सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. आता हिवाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटन साहसी पर्यटनासाठी घरा बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात राजगड, सिंहगड, लोहगड, शिवनेरी, राजमाची सारख्या गड किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.’’

हेही वाचा: पौड : व्हायरल व्हिडीओमुळे रस्त्यावरील आजीबाईंना मिळाला सहारा

सह्याद्रीच्या अनेक गड-किल्ल्यांवर दररोज हजारोच्या संख्येत पर्यटक भेट देतात. मात्र गिर्यारोहणासाठी बाहेर पडणारे गिर्यारोहक हे गर्दी असलेल्या गड किल्ल्यावर जाणे सध्या टाळत आहेत. तर ज्या ठिकाणी पर्यटनाला जास्त प्रमाणात कोणी येत नाही अशा किल्ल्यांना भेट देण्यासाठी त्यांचे प्राधान्य वाढले आहे, असेही झिरपे यांनी सांगितले.

गड किल्ले ठरताहेत ‘विकेंड हब’ :

आठवडाभरातील कामाचा ताण कमी करण्यासाठी नजीकच्या गड किल्ल्यांवर भटकंती हा हळू हळू सर्वांच्या आवडीचा भाग बनत चालला आहे. त्यात

दिवसा ट्रेकिंगचा थरार, उंच शिखराची चढाई करत रात्री वाहणारे थंड वारे, नीरव शांतता, निसर्गाच्या कुशीत नाईट कॅम्पींग, पहाटे सूर्योदयाचे दृश्‍य अशा विविध गोष्टींच्या अनुभवासाठी सध्या गड किल्ल्यांवर कॅम्पींगसाठी विकेंडला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे आता गड किल्ले हे तरुणांसाठी ‘विकेंड हब’ होत आहे.

हेही वाचा: तळेगाव ढमढेरे : न्यायाधीशांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिराची सांगता

स्थानिकांच्या उत्पन्नाला चालना ः

कोरोनामुळे गड किल्ल्यांची भटकंती, गिर्यारोहण अशा विविध गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे गड किल्ल्यांच्या परिसरात असलेल्या स्थानिकांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक गड किल्ल्यांवर पर्यटन किंवा गिर्यारोहणासाठी जात असल्याने स्थानिक लोकांचे उत्पन्न पुन्हा सुरू झाले आहे.

‘‘राजगड, तोरणा, हरिश्चंद्र गडावर मोठ्या प्रमाणात ट्रेकिंगसाठी लोकं भेट देत आहेत. ट्रेकिंगसाठी मी सातत्याने सह्याद्रीच्या विविध गड किल्ल्यांना भेट देत आहे. मात्र सध्या गड किल्ल्यांवरील वाढती गर्दीमुळे इतर किल्ल्यांना भेट देत आहे. ज्याबाबत अद्याप जास्त लोकांना माहिती नाही. तसेच मला इतर काही मित्रांकडून अशा प्रकारच्या किल्ल्यांबाबत माहिती मिळत आहे. त्यामुळे नव्याने समजत असलेल्या या वेगवेगळ्या किल्ल्यांचा डेटा ही संकलित करत आहे.’’

- अनिश परदेशी, ट्रेकर व सह्याद्रीविषयक अभ्यासक

loading image
go to top