पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात; 24 तासांत चारही आरोपी जेरबंद

निलेश बोरुडे
Sunday, 18 October 2020

मैत्रिणीविषयी अपशब्द बोलणे बेतले जीवावर

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रोडवरील नांदेड (ता. हवेली) येथील सर्वे नं. 25 मध्ये शनिवारी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या यश मिलिंद कांबळे (वय 30, रा. पांडुरंग कृपा,सर्वे नं. 25, नांदेड) याच्या हत्येचा उलगडा  हवेली पोलिसांनी 24 तासांच्या आत केला असून मैत्रिणीबद्दल अपशब्द बोलल्याच्या रागातून चौघांनी लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत यशचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे.            

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मदन शाम गेंटाल (वय 24 रा. गीतांजली अपार्टमेंट नांदेड फाटा, सिंहगड रोड), चमन नईम बागवान (वय 18 रा. गौरी बिल्डिंग, सावंत बाग, सर्वे नं. 25, नांदेड, ता. हवेली), सुमित गंगाधर शेजवळ (वय 22, रा. शेजवळ हाइट्स, सर्वे नं. 25, नांदेड) आणि आकाश दत्तात्रय घाडगे ( वय 20, मातोश्री निवास, सावंत बाग, सर्वे नं. 25, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आकाश दत्तात्रय घाडगे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे डीएसके विश्व येथे लपून बसलेल्या इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदन शाम गेंटाल याचे नांदेड फाट्याजवळ राहणार्‍या एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. तीच मुलगी मलाही भेटत असल्याचे यश कांबळे याने काही दिवसांपूर्वी चमन बागवान याला सांगितले होते. चमन याने ही माहिती मदन गेंटाल, सुमित शेजवळ आणि आकाश घाडगे यांना सांगितल्यानंतर शनिवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही यश कांबळे यास नांदेड फाट्याजवळ बोलावून घेतले. त्यानंतर पाचही जण समीर शेजवळ याच्या नांदेड फाट्याजवळील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. दारूच्या नशेत असलेल्या चौघांनीही यश यास हाताने व लाकडी दांडक्याने जबर मारहाण सुरू केली. जीव वाचविण्यासाठी यश कांबळे याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली असता मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यश ची हालचाल थांबल्याचे पाहून आरोपी तेथून फरार झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, पोलीस नाईक रामदास बाबर, संजय शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, संतोष भापकर, दिनेश कोळेकर, विश्वास मोरे, चालक महेंद्र चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास सुरू केला. हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशन च्या आधारे 24 तासांच्या आतच सर्व आरोपींना अटक करत पोलिसांनी हत्त्येचा उलगडा केला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलीस अधिक्षक विवेक पाटील तपासावर लक्ष ठेवून होते. याबाबत अधिक तपास हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune, a friend killed a friend; All four accused arrested within 24 hours