पुणे : वाढीव मांडवावर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Mandal

पुणे : वाढीव मांडवावर होणार कारवाई

पुणे : मंडळांना परवाना शुल्क माफ, २०१९चा परवाना २०२७ पर्यंत वापरता येणार असे गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले असताना आता यावेळी मांडवासाठी घालून दिलेल्या नियमांचेही पालन होणे आवश्‍यक आहे. वाहतुकीला अडथळा होईल, रुग्णवाहिका, स्थानिक रहिवासी यांची अडवणूक होणार नाही या पद्धतीने मांडव घालणे आवश्‍यक आहे. त्यासाठीची नियमावली मंडळांना दिलेली आहे. पण तरीही मंडळांकडून नियमावलीचे उल्लंघन करून मांडव उभारले तर महापालिकेतर्फे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्ष गणेशोत्सव साजरा केला. पण हे विघ्न आता दूर झाल्याने शासनाने कोरोनाच्या निर्बंधातून मुक्ती देत उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना श्री गणेशाच्या आगमनाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गणेश मंडळांकडून देखावे, सजावट यासाठी विशेष भर दिला जात आहे. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांना दरवर्षी महापालिका, पोलिसांकडून परवाना घ्यावा लागत होता. त्यामध्ये मोठी यंत्रणा लागते. तसेच वेळही वाया जात होता. त्यामुळे पाच वर्षासाठी परवाना द्यावा अशी मागणी केली जात होती. त्यानुसार २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी एकच परवाना असणार आहे. त्याच प्रमाणे मांडव, कमानी, रनिंग मांडव यासाठीचे शुल्कही माफ करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाचे मंडळांनी स्वागत केले आहे.

महापालिकेने परवाना, शुल्क यात सवलत दिली असली तरी मांडव घालताना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मांडव घातले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक स्थापन केले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे एक पथक आहे. तर मुख्य अतिक्रमण विभागानेही पथक स्थापन केले आहे. संपूर्ण रस्ता व्यापून मांडव घातला आहे, स्थानिक रहिवास्यांना जा ये करण्यासाठी जागा ठेवली नाही, रुग्णवाहिका, ॲसो, पीएमटी जाण्यासाठी जागा ठेवली नाही, मान्यतेपेक्षा जास्त जागा व्यापून मांडव टाकला आहे, रनिंग मांडव ५० मीटर पेक्षा जास्त लांब टाकला आहे, कमानी खालून मोकळ्या सोडल्या नाहीत, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

- नितीन पंडित, कोषाध्यक्ष, तुळशीबाग गणपती मंडळ

‘‘दरवर्षीचा मांडवाचा आकार व जागा निश्‍चीत केली जाते. काही मंडळांचे शताब्दी वर्ष, सुवर्णमहोत्सवी वर्ष असते अशावेळी ही मंडळे जागा बदल करून मोठे मांडव टाकतात. त्यासाठीची परवानगीही घेतली जाते. पण मध्यवर्ती भागात छोट्या रस्त्यांवर वाहतुकीला अडचण होऊ शकते, तेथील जागेची उपलब्धता लक्षात घेतली पाहिजे. मंडळांना सामाजिक भान असल्याने वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवतील, पण महापालिकेनेही सरसकट कारवाई करू नये.’’

‘‘सर्व मंडळ नियम पाळूनच मांडव घालत आहेत. हवेत मांडव घालत असून, खालून वाहतूक सुरू आहे. १२ फूट उंच मांडव रस्त्याच्या दोन्ही बाजूला १५ दिवसासाठी नो पार्किंग करावे. शाळांची मैदाने पार्किंगसाठी उपलब्ध करून द्यावेत.’’

- पियुष शहा, अध्यक्ष, साईनाथ मित्र मंडळ, बुधवार पेठ

‘‘महापालिकेने पाच वर्षासाठी मंडळांना परवाना दिला आहे. पण परवाना देताना जेवढी जागा मान्य केली आहे तेवढीच मांडव घालावेत. नागरिकांची, वाहनांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन केले आहे.’’

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

मंडळांना हे करावे

- मांडव घालताना रुग्णवाहिका, ॲटोरिक्षा, दुचाकी, पीएमटी जाण्यासाठी रस्ता मोकळा सोडला पाहिजे

- वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मांडव घालताना तो किमान १८ फूट उंच असावा, त्या खालून वाहने जाऊ शकतील.

- रनिंग मांडव ५० मीटरपेक्षा जास्त टाकू नये

- जाहिरात कमानी खालच्या बाजूने मोकळ्या सोडाव्यात

- मांडवासाठी जी जागा निश्‍चीत झाली आहे तेथेच मांडव टाकावा

- मंजूर जागेपेक्षा जास्त आकाराचा मांडव घालू नये

Web Title: Pune Ganeshotsav Mandals Mandwa Action

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..