esakal | बॅनरबाजीत अडकले फिरते विसर्जन हौद
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

बॅनरबाजीत अडकले फिरते विसर्जन हौद

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने फिरतो हौद वेळेत तयार केले नाहीत याचा फटका नागरिकांना बसला. आज (शनिवारी) दुपार होऊन गेली तरी फिरत्या विसर्जन हौदाच्या गाड्यांवर बॅनर लावले नसल्याने या गाड्या मार्गस्थ झाल्या नाहीत. पाऊस पडून गाड्या ओल्या झाल्याने त्यावर बॅनर बसत नसल्याने दुपारपर्यंत गाड्या कात्रज तलाव येथे अडकून पडल्या होत्या. तर, मुर्ती संकलन कुठे केले जाणार याची माहितीच नागरिकांना नसल्याने विसर्जन घाटावर गर्दी झाली होती.

कोरोनामुळे नागरिकांनी विसर्जन घाटावर, विसर्जन हौदावर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेने केले.

हेही वाचा: Sakinaka Rape Case: कठोर शिक्षेचा 'शक्ती कायदा' सध्या कुठे अडकलाय?

प्रत्येक भागात महापालिकेचे फिरते विसर्जन हौद असतील. तसेच २४८ ठिकाणी मूर्ती संकलन केले जाईल असे सांगण्यात आले होते. आज दुपारपासून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनासाठी लगबग सुरू होते. पण फिरते हौद कुठेच दिसत नसल्याने व मूर्ती संकलन कुठे केले जाणार याची माहिती नसल्याने नागरिकांची अडचण झाली. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या भागात फिरून महापालिकेने सुविधा कुठे उपलब्ध केली आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कुठेच फिरता हौद व मूर्ती संकलन केंद्र दिसले नाही.

घनकचरा विभागातर्फे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४ फिरत्या हौदाची व्यवस्था केली आहे. या गाड्यांची सजावट करण्यासाठी गणपतीचे चित्र, महापालिकेचा लोगो व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश लावण्यात येत आहेत. मात्र, दुपार होऊन गेला तरी नागरिकांना गाड्या दिसत नव्हत्या. हा उशीर का होत आहे याचा शोध घेण्यासाठी ‘सकाळ’ने फिरत्या विसर्जन हौदाच्या गाडीच्या चालकांशी संपर्क साधला. त्यावळी त्यांनी आमच्या गाड्यांची अजून सजावट सुरू आहे, बॅनर लावण्यास उशीर होतोय, त्यात परत पाऊस आल्याने हे बॅनर चिटकत नाहीत. ज्या गाड्या तयार झाल्या त्या सोडल्या आहेत, असे चालकांनी सांगितले.

हेही वाचा: Sakinaka rape case: मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष द्यावं

‘‘महापालिकेने विसर्जनसाठी तयारी केली आहे. आमच्या गाड्या तयार आहेत. ज्या चालकांनी तुम्हाला बॅनर लावले नाहीत असे सांगितले. त्यांचा नंबर द्या. शहराच्या सर्व भागात आमच्या मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय, नगरसेवकांच्या गाड्या फिरत आहेत.‘‘गणपतीचे विसर्जन करण्यासाठी वडगाव, माणिकबाग येथे फिरून आलो कुठेच व्यवस्था दिसली नाही, फिरते हौदही दिसले नाहीत. राजाराम पूल येथे टाक्या उलट्या करून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे अखेर घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.’’

- सुरेश गोडबोले, नागरिक

loading image
go to top