#PuneGarbage वाघोलीत साठताहेत कचऱ्याचे ढीग

Pune-Garbage
Pune-Garbage

वाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने वाघोलीतील कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्याही बंद करण्यात आल्याने घरातच कचरा साठविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

वाघोलीत महिनाभरापासून कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. खाणीत कचरा टाकण्याच्या निर्णयाला विरोध झाल्याने विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये सध्याच्या कचरा डेपो परिसरातच कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र तेथील अतिक्रमणामुळे जागा नसल्याने तो टाकला जात नाही. काही ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वॉर्डातील कचरा रात्रीच्या वेळी उचलून त्याची विल्हेवाट लावली. कचरा प्रकल्पाचे काम होण्यासाठी अजून किमान १० ते १५ दिवस लागण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया सुरू होईल. तोपर्यंत कचरा उचलण्याची व घंटागाड्या सुरू करण्याची गरज आहे. शुक्रवारी (ता. १२) कचरा प्रश्नावर ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र १८ पैकी नऊ सदस्य अनुपस्थित होते. लोहगाव रस्ता परिसरातील सोसायटीधारकांनी कचरा पेटत असल्याने त्याचा त्रास होत असल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली होती.

सदस्यांचे राजकारण
कचऱ्याप्रश्नी आयोजित विशेष ग्रामसभेपूर्वी सदस्यांच्या बैठकीचे याच प्रश्नासाठी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळीही हे सदस्य उपस्थित नव्हते. शुक्रवारीही त्यांनी दांडी मारली. सदस्यांचे हे राजकारण नागरिकांसाठी घातक ठरू नये हीच अपेक्षा.

कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या युनिटचे काम चार-पाच दिवसांत होईल. त्यानंतर कचऱ्याची समस्या सुटेल.
- मधुकर दाते, ग्रामविकास अधिकारी   

कचरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वीच कचरा कुठे साठवायचा कुठे याचे नियोजन होणे गरजेचे होते; मात्र असे न झाल्याने आज ही समस्या उद्‌भवली आहे. 
- एक सोसायटीधारक

कचरा समस्येबाबत शुक्रवारी सदस्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. नऊ सदस्य उपस्थित राहिले नाही. मग अशा प्रश्नावर निर्णय कसा घ्यायचा. दोन दिवसांत कचरा उचलून तो साठवण्याची व्यवस्था करू.
- वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com