पुण्याचा जावई होण्यासाठी दोन पैकी एक गोष्ट हवीच! मुलींच्या अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

love marraige 1.jpg

पुण्याचा जावई होण्यासाठी दोन पैकी एक गोष्ट हवीच! मुलींच्या अपेक्षा

पुणे : एकेकाळी लग्नानंतरच जोडीदार पाहायला मिळत होता. पण आता जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य बहुतांश मुलींना मिळाले आहे. पुण्यातील मुलींचा पुण्यातीलच किंवा परदेशातील स्थळाबद्दल आग्रह आहे. काही वधू- वर सूचक मंडळे आणि युवतींशी संवाद साधल्यावर पुण्यातील मुलींचा हा ट्रेंड समोर आला.

पुण्यातील मुलींना लग्नानंतर शक्यतो पुण्यातच राहायचे आहे किंवा परदेशात तरी जायचे आहे. तर, अन्य जिल्ह्यांतील मुलींना सासर म्हणून पुणेच मिळावे, अशीही त्यांची मनीषा आहे. एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला असलेली शैला जढर स्पष्ट सांगते कि " मी लहानाची मोठी पुण्यात झाले. पुणे हे माझ्यासाठी दुसरं घरचं आहे. इथली लाईफस्टाईल, खाद्यसंस्कृती, भटकंतीच्या जागा इतक्या अंगवळणी पडल्यात की, दुसरीकडे कुठेही मन रमेल असे वाटत नाही."

पुण्यातील मुलींचा ट्रेंड सांगताना वधू - वर मंडळ चालवणाऱ्या योगिता बेल्हेकर म्हणाल्या, "पुण्यातील ७० टक्के मुलींची तर हीच अपेक्षा असते की त्यांना पुण्यातीलच जोडीदार हवा. पुण्यात राहता आले तर, आई- वडिलांची काळजी घेता येईल, त्यांच्या जवळ राहता येईल, असाही अनेक मुलींचा उद्देश असतो.’’ पुण्याच्या बाहेर जायचं असेल तर परदेशातील स्थळाला येथील मुलींची पसंती असते, असे लक्षात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दीप्ती खांडगे म्हणाली, "मी स्वतः आयटी प्रोफेशनल आहे. भविष्यात केव्हाही परदेशात जायची संधी मिळू शकते. त्यामूळे परदेशात स्थायिक असलेला मुलगा जोडीदार म्हणून मिळणे माझ्या करिअरच्या दृष्टीने चांगले आहे."

पुण्यातील या ट्रेंडमुळे ग्रामीण भागातील युवकांची अडचण होत आहे. नारायण गावातील मोहन चासकर म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी कोरोनामुळे कंपनीने पगार कपात केली म्हणून पुण्यातून मी गावात आलो. शेतीपुरक व्यवसाय करायचे ठरवले. परंतु आता लग्नासाठी मुलगी मिळणे अवघड झाले आहे. नोकरी कोणतीही असो पण मुलींना पुण्यातीलच मुलगा हवा आहे."

''मला स्थळ पुण्यातीलच हवं. कारण मी स्वतः पुण्यात एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. माझा भाऊ नोकरीमुळे सतत बाहेर असतो. त्यामुळे आई-वडीलांची जबाबदारी माझ्यावर आहे. पुण्यातील जोडीदार मिळाला तर सासर आणि माहेर या दोन्ही जबाबदाऱ्या मी पार पाडू शकते.''

- प्रेमल दाभाडे

''मला फिरायला खूप आवडते. त्यासाठी परदेशातही जायची इच्छा आहे. आयटी क्षेत्रात मी नोकरी करीत असल्यामुळे परदेशात करियरच्या संधीही खूप मिळतील. म्हणून मला परदेशातीलच जोडीदार हवा."

- दिपाली वाळुंज