esakal | पुणे : चिमुकलीचा इशारा अन् गुंड सोन्या धोत्रे पोलिसांच्या जाळ्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

किरकटवाडी : विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला गुंड सोन्या धोत्रेला अटक.

चिमुकलीचा इशारा अन् गुंड सोन्या धोत्रे पोलिसांच्या जाळ्यात!

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : ॲट्रॉसिटी, बेकायदा जमावाद्वारे धमकावणे, मारामारी करणे, घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि अटक टाळण्यासाठी रुग्णालयात उपराचं ढोंग करुन तिथून फरार झालेला कुख्यात सोन्या धोत्रे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे एका चिमुकलीनं पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली. (Goon Sonya Dhotre caught by police after little girl gives information aau85)

पोलिसांच्या माहितीनुसार, डेटॉल प्राशन करून दवाखान्यात उपचार घेत असताना तिथून फरार झालेला गुंड तुषार उर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे (वय 23, रा. जयप्रकाश नारायण नगर, सिंहगड रस्ता, पुणे) याला हवेली पोलिसांनी महंमदवाडी येथून अटक केली आहे. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणात धोत्रेच्या अटकेसाठी लक्ष घातलं होतं. घरात घुसून महिलांना शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जेपी नगर येथील एका महिलेनं हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर रात्रीच्या वेळी हवेली पोलिसांचं पथक धोत्रेला अटक करण्यासाठी गेले असताना त्यानं अटक टाळण्यासाठी बाथरूममधील डेटॉल प्राशन केलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी किरकटवाडी फाट्यावरील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. उपचार घेतल्यानंतर पोलीस अटक करण्यासाठी येणार असल्याची माहिती कळताच सोन्या धोत्रे ६ जून रोजी दवाखान्यातून फरार झाला होता. तेव्हापासून हवेली पोलीस त्याचा शोध घेत होते.

असा घडला अटकेचा थरार

दरम्यान, सोन्या धोत्रे त्याच्या पत्नी व मुलासह उरुळी देवाची परिसरात राहत असल्याची खबर हवेली पोलिसांना मिळाली. स्वतः पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे, पोलीस हवालदार विलास प्रधान, रामदास बाबर, निलेश राणे, पोलीस नाईक संतोष भापकर व गणेश धनवे यांचे पथक उरुळी देवाची येथील वडार वस्ती परिसरात सोन्या धोत्रेचा शोध घेत होते. तेथील धोत्रेचे नातेवाईक पोलिसांपासून माहिती लपवत होते. तेवढ्यात पोलिसांच्या हातातील सोन्या धोत्रेचा फोटो पाहून एक ६ वर्षांची चिमुकली म्हणाली,"हे काका त्या घरात राहायला आलेत" चिमुकलीच्या शब्दांनी पोलिसांना धीर आला. पोलिसांनी बंगल्याला वेढा दिला. बंगल्याचे गेट, मुख्य दरवाजा यांना बाहेरून कुलूप होते, परंतु आतील लाईट सुरू असल्यानं पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता आतमध्ये केवळ सोन्या धोत्रेची पत्नी व मुलगा होता. तेथे सोन्या धोत्रेस आसरा देणाऱ्या नातेवाईकांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यातील एकाने सोन्या धोत्रे राहत असलेले महंमदवाडी येथील ठिकाण दाखवले. महंमदवाडी येथील एका घरात झोपेत असतानाच हवेली पोलिसांच्या पथकाने सोन्या धोत्रेच्या मुसक्या आवळल्या.

नागरिकांनी भीती न बाळगता पोलिसांनी माहिती द्यावी

याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार म्हणाले, "माहिती मिळाल्यापासून आम्ही त्याच्या मागावर होतो. तो सारखा सिम कार्ड व राहण्याचे ठिकाण बदलत होता. ओळख लपविण्यासाठी सोन्या धोत्रेने त्याचा पेहराव बदलला होता. हेअर स्टाइल बदलली होती. त्याला पकडण्यात 'त्या' चिमुकलीची मोठी मदत झाली. सोन्या धोत्रे मुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सोन्या धोत्रेच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी असतील तर कोणतीही भीती न बाळगता हवेली पोलिस ठाण्याला माहिती द्यावी"

loading image