पुणे : 350 कलमी पेरूच्या रोपांचे वाटप करून साजरा केला नातवाचा वाढदिवस

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा
Pune Grandfather celebrated his grandson birthday by distributing grafted seedlings
Pune Grandfather celebrated his grandson birthday by distributing grafted seedlingssakal

नारायणगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नारायणवाडी (ता.जुन्नर) येथील शेतकरी आजोबांनी आपल्या नातवाचा चौथा वाढदिवस कलमी पेरूच्या (तैवान जम्बो) सुमारे साडेतीनशे रोपांचे वाटप महिला शेतकऱ्यांना करून तसेच येथील मीना नदी स्वच्छता अभियान व साई मंदिराचे बांधकाम यासाठी प्रत्येकी ११ हजार १११ रुपयांची देणगी देऊन गायींच्या गोठ्यात साजरा केला. या पर्यावरण पूरक वाढदिवसाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे.

नारायणवाडी येथील श्रीपतराव मेहेत्रे हे प्रगतशील शेतकरी आहेत. शेती हाच श्रीपतराव मेहेत्रे यांचा पिढीजात व्यवसाय आहे. शेती शिवारावर जीवापाड प्रेम करणारे व आधुनिक शेतीची आवड असलेले श्रीपतराव मेहेत्रे यांनी आपल्या शेतीत द्राक्ष, ऊस, कांदा प्रमुख पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत.त्यांची मुले गणेश व सोमनाथ हे सुद्धा नोकरीच्या मागे न लागतात शेती करत आहेत. त्यांच्या शेतातील घरासमोर आंब्याने लगडलेली सुमारे शंभर वर्षांपूर्वीची झाडे त्यांनी जोपासली असून आम्र वृक्षांच्या सावलीत गायींचा गोठा आहे.गणेश श्रीपतराव मेहेत्रे यांचा मुलगा वरद (वय ४) याचा ५ जून २०२२ रोजी चौथा वाढदिवस होता.

उपसरपंच मनीषा मेहेत्रे, पुनम बाळसराफ,जयश्री डोके, सुषमा भुजबळ शीतल कोल्हे या महिलांनी वरद याचे औक्षण करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरद याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेतकरी महिलांना एक वर्षाची वाढ झालेल्या कलमी पेरूच्या सुमारे साडेतीनशे रोपांचे वाटप करण्यात आले. रोप वाटपाचा शुभारंभ दै.सकाळचे पत्रकार रवींद्र पाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी श्रीपतराव मेहेत्रे यांनी नातू वरद याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारायणगाव ग्रामपंचायतने मीना नदी स्वच्छता अभियान अंतर्गत सुरू केलेल्या मीना घाट सुशोभीकरणासाठी ११ हजार १११ रुपयांची व साई मंदिराच्या बांधकामासाठी ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली.या वेळी माजी सैनिक दत्तात्रय मेहेत्रे, अमोल पाटे, डॉ. भरत गायकवाड, रोहन पाटे, योगेश तोडकरी, महेंद्र भोर,प्रशांत खैरे अनिल दिवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश मेहेत्रे यांनी केले.

● तीन वर्षांपूर्वी श्रीपतराव मेहेत्रे यांच्या नातीच्या विवाह प्रसंगी संजय मेहेत्रे, समीर मेहेत्रे यांनी मानपानाचा खर्च टाळून उपस्थित वऱ्हाडी मंडळींना दोन हजार केशर जातीच्या कलमी आंबा रोपांचे वाटप केले होते. या उपक्रमाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन मन की बात या कार्यक्रमात मेहेत्रे कुटुंबाच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून मेहेत्रे कुटुंबाचे अभिनंदन करून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

● श्रीपतराव मेहेत्रे : हॉटेलमध्ये जाऊन, मोठे फ्लेक्स लावून मोठया प्रमाणात खर्च करून वाढदिवस साजरे केले जातात. त्या ऐवजी वाढदिवस साध्या पारंपरिक पद्धतीने साजरा करून वृक्षारोपण, पसरीसर स्वच्छता, गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत आदी समाजउपयोगी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. प्रत्येक वाढदिवसाला किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com