पुण्यात सर्वाधिक पावसाचा आठवडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुण्यात जुलैमधील प्रत्येक आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. ३१ जुलैला संपलेल्या आठवड्यात या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 

पुणे -  पुण्यात जुलैमधील प्रत्येक आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. ३१ जुलैला संपलेल्या आठवड्यात या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 

या वर्षी मॉन्सूनची सुरवातच उशिरा झाली. सर्वसाधारणतः १ जूनला केरळच्या किनारपट्टीवर हजेरी लावणाऱ्या मॉन्सूनचे ८ जूनला तेथे आगमन झाले. त्यामुळे ७ जूनपर्यंत पुण्यात पोचणारा मॉन्सून यंदा २८ जूनला पोचला. जूनमध्ये पुण्यात पावसाने मोठी ओढ दिली होती. सरासरीच्या तुलनेत जेमतेम पन्नास टक्के पाऊस जूनच्या पहिल्या चार आठवड्यात पडला. त्यानंतर जुलैमध्ये दमदार हजेरी लावलेल्या पावसाने प्रत्येक आठवड्याची सरासरी ओलांडली, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरात जुलैच्या सुरवातीला पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी  लावली. दमदार पावसाची अपेक्षा पुणेकरांनी होती. पिण्याच्या पाण्यासाठी धरणे भरणे आवश्‍यक होते; पण मॉन्सून मात्र सक्रिय होत नव्हता. अशी स्थिती असतानाच पुण्यात ४ जुलैनंतर पावसाला सुरवात झाली. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत ६२ टक्के पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिवस-रात्र पाऊस पडत होता. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे हवामान खात्याकडे २५ ते ३१ जुलैदरम्यान सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पुण्याचा पाऊस
     १ जून ते २ ऑगस्ट दरम्यान शहरात पडणारा सरासरी पाऊस - ३३५.२ मिलिमीटर
     या दरम्यान पडलेला पाऊस -६०० मिलिमीटर

तीन दिवसांचा अंदाज
  ता. ३ - हलक्‍या ते मध्यम सरी 
  ता. ४- मध्यम स्वरूपाचा पाऊस  
  ता. ५ - हलक्‍या ते मध्यम सरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune highest rainfall Week