Illegal Flex : अनाधिकृत फ्लेक्सने बिघडवले कोथरूडचे सौंदर्य

राजकीय नेत्यांचे वाढदिवस, जयंती, उत्सव, शुभेच्छापर फ्लेक्स उभे करण्यात आले असून जणू काही फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच सुरू आहे की काय? असे चित्र चौकामध्ये दिसून येते.
Illegal Flex
Illegal Flexsakal
Summary

राजकीय नेत्यांचे वाढदिवस, जयंती, उत्सव, शुभेच्छापर फ्लेक्स उभे करण्यात आले असून जणू काही फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच सुरू आहे की काय? असे चित्र चौकामध्ये दिसून येते.

पुणे - राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेलके चौकात तब्बल अठरा फ्लेक्स उभे केले आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, जयंती, उत्सव, शुभेच्छापर फ्लेक्स उभे करण्यात आले असून जणू काही फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच सुरू आहे की काय? असे चित्र चौकामध्ये दिसून येते.

महापालिकेच्या दिशादर्शक फलकावर काही फ्लेक्स लावल्याने नवीन वाहनचालकांना हे दिशादर्शक फलक दिसत नाहीत. यासह महर्षी कर्वे पुतळा चौकात देखील अशीच परिस्थिती असून या ठिकाणी पदपथावर लाकडी बांबू लावून फ्लेक्स उभे केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात देखील अशीच परिस्थिती आहे. यामुळे पादचाऱ्यांना पदपथावर चालणे मुश्कील झाले आहे.

कोथरूड भाग उच्चभ्रू म्हणून ओळखला जातो. स्थानिक रहिवाशांना फ्लेक्स मुळे पदपथावरून चालणे, फ्लेक्सच्या मागील रस्ता न दिसणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फ्लेक्समुळे कोथरूडच्या सौंदर्यात बाधा येत असून शहराचे विद्रूपिकरण होत आहे. याकडे प्रशासन सजग नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर भेलके चौक असताना कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फ्लेक्स लावण्यासाठी आतापर्यंत माझ्याकडे कोणी परवानगी घेण्यासाठी आले नाही. संबंधित ठिकाणी पाहणी करून लवकरच कारवाई करण्यात येईल.

- निलेश घोलप, आकाशचिंन्ह परवाना निरीक्षक कोथरूड क्षेत्रीय कार्यालय.

अशा फ्लेक्समुळे कोथरूडच्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. राजकीय नेत्यांचा पाठींबा असल्याशिवाय फ्लेक्स लागू शकत नाहीत. प्रत्येक फ्लेक्सवर कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांचे फोटो असतात, त्यामुळे अधिकारी कारवाई करायला धजावत नाहीत. मोठ्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे की, फ्लेक्स लावून माणूस मोठा होत नसतो.

- सुनील महाजन, अध्यक्ष-कोथरूड नाट्य परिषद.

रस्त्यावर फिरायला गेलं की निसर्ग कमी आणि फ्लेक्स जास्त दिसतात. मोठ -मोठे फ्लेक्स लावलेलं असतात,त्यावर दहा पंधरा फोटो असलेले फ्लेक्स तोंडावर आपटतात.सध्या शहरात अनाधिकृत फ्लेक्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. राजकीय नेते यामधून स्वताचे प्रदर्शन करत आहेत. उमद्या राजकीय नेत्यांचे प्रदर्शन अनाधिकृत फ्लेक्समधून केले जात आहे. पुणेकरांनी मतदान पेटीतून अशा लोकांना धडा शिकवायला हवा.

- विनिता देशमुख, जेष्ठ पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्त्या

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com