esakal | कोरोना दक्षता समितीकडून कंपन्यांची पाहणी; नियम पाळणाऱ्यांचा गोऱ्हे बु. ग्रामपंचायतीकडून सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना दक्षता समितीकडून कंपन्यांची पाहणी; नियम पाळणाऱ्यांचा गोऱ्हे बु. ग्रामपंचायतीकडून सत्कार

कोरोना दक्षता समितीकडून कंपन्यांची पाहणी; नियम पाळणाऱ्यांचा गोऱ्हे बु. ग्रामपंचायतीकडून सत्कार

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: प्रशासनाच्या निर्देशानुसार गावपातळीवर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका व ग्रामसेवक यांची मिळून तयार करण्यात आलेल्या गोऱ्हे बुद्रुक येथील कोरोना दक्षता समितीकडून गावाच्या हद्दीत असणाऱ्या मोठ्या कंपण्यांकडून कोरोनाबाबत नियम पाळले जातात की नाही याची अचानक भेट देऊन पाहणी करण्यात आली. यावेळी नियम पाळत असल्याचे आढळून आल्याने कंपणीच्या व्यवस्थापकांचा सत्कार करत त्यांचे कौतुक करण्यात आले.

गोऱ्हे बुद्रुक ग्रामपंचायतीने सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यासाठी गावातील पदाधिकारी व सरकारी कर्मचारी समन्वय साधून वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध घालून अत्यावश्यक वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहेत. याची गोऱ्हे बुद्रुक येथे काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

गोऱ्हे बु. गावच्या हद्दीत डॅटसन इलेक्ट्रॉनिक्स व लेक्झाॅन इक्विपमेंट अशा दोन मोठ्या खाजगी कंपन्या असून दोन्हींमध्ये मिळून सुमारे दोनशे कर्मचारी येथे कामाला आहेत. कर्मचारी परिसरातील वेगवेगळ्या गावांतून येत असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन दक्षता समितीने अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे का, मास्क वापरला जातोय का, प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात कर्मचारी संख्या आहे का अशा वेगवेगळ्या बाबींची पाहणी केली. अचानक पाहणी करण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या समितीने नियम पाळले जात असल्याबाबत सत्कार करुन कंपनीच्या व्यवस्थापकांना सुखद धक्का दिला व पुढेही नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी गोऱ्हे बु.च्या सरपंच शारदा खिरीड, उपसरपंच नरेंद्र खिरीड, ग्रा.पं.सदस्य सुशांत खिरीड,ग्रामसेविका अर्चना चिंधे, आशा सेविका प्रिती नानगुडे, आशा नानगुडे, ग्रा. पं. कर्मचारी संतोष फणसे, अनिता पवार हे उपस्थित होते.

loading image