पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप; विविध पुरस्कारांनी गौरव 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप; विविध पुरस्कारांनी गौरव 

"अ सन', "आनंदी गोपाळ' सर्वोत्कृष्ट  
पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर "आनंदी गोपाळ'ची मोहोर उमटली. या चित्रपटाला यंदाचा "संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार' मिळाला. "अ सन' या ट्युनिशियातील चित्रपटाने "प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' पटकावला. 

अठराव्या "पिफ'चा समारोप गुरुवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात झाला. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, अभिनेते विक्रम गोखले, साउंड डिझायनर बिश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, समर नखाते, मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, मेघराज राजेभोसले, डॉ. सुनीता कराड आदी या वेळी उपस्थित होते. 

सुजय डहाके दिग्दर्शित "तुझ्या आईला' या चित्रपटाने "परीक्षकांची पसंती पुरस्कार', "अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा', "छायाचित्रण' आणि "प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार' मिळाला. समीर विद्वांस दिग्दर्शित "आनंदी गोपाळ' या चित्रपटाने "संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार' पटकाविला. या चित्रपटाला पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील "सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार' डॉ. अजित वाडीकर (वाय) यांना, "सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार' ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ) यांना, "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' मुक्ता बर्वे (वाय) यांना, "सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार' नियाज मुजावर (तुझ्या आईला) यांना, तर "सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पुरस्कार' विजय मिश्रा (तुझ्या आईला) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी 25 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सुजय डहाके दिग्दर्शित "तुझ्या आईला' आणि मेहडी बरसौई दिग्दर्शित "अ सन' या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स ऍवार्ड) पुरस्काराने गौरविण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात "अ सन' या चित्रपटाला "प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' देत गौरविण्यात आले. 10 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच विभागातील "प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने' "सुपरनोवा' चित्रपटाचे दिग्दर्शक बर्तोज कृहलिक यांना गौरविण्यात आले. आंतरराष्टीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात "अ सन' चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाइन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट' पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. यावर्षी "मार्केट' या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप कुरबाह यांना हा पुरस्कार देण्यात आला. वाय चित्रपटात डॉक्‍टरची भूमिका करणारे अभिनेते नंदू माधव यांना त्यांच्या भूमिकेबद्दल विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा 
पटकथा लेखनाचा परीक्षक विशेष पुरस्कार : मायकल इडोव (चित्रपट-द ह्युमरिस्ट), परीक्षक विशेष प्रमाणपत्र : चित्रपट "मारिघेल्ला'. 

विद्यार्थी लघुपट पुरस्कार 
बेस्ट लाइव्ह ऍक्‍शन लघुपट पुरस्कार : चित्रपट "अ पीस ऑफ होप' (दिग्दर्शक स्याहरेझा फाहलेवी), दिग्दर्शक पुरस्कार : अलीरेझा घासेमी. 

सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन लघुपट पुरस्कार : मझाईक्‍स आर्क, स्टीप्स ऑफ खजर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : चित्रपट स्टीप्स ऑफ खजर (दिग्दर्शक सोफिया मेलनेक) 

आदिवासी लघुपट पुरस्कार 
-चित्रपट "द माइटी गोंड्‌स ब्रिक्‍स ऑफ चंदागड' : विप्लव शिंदे 
-चित्रपट पडकाई : दिग्दर्शक अमर मेलगिरी 
-चित्रपट रानी बेटी : दिग्दर्शक धर्मा वानखेडे 

वाय चित्रपट हे माझे स्वप्न होते. मी डॉक्‍टर आहे. मला चित्रपट दिग्दर्शनाचा कोणताही अनुभव नाही. गेली चार वर्षे आम्ही या चित्रपट निर्मितीच्या कामात गुंतलो होतो. पदार्पणात पिफ पुरस्कार मिळाला, याचा खूप आनंद आहे. हे यश माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. 
- डॉ. अजित वाडीकर, दिग्दर्शक, वाय 

पुरस्कारप्राप्त चित्रपट 
अ सन : एक कुटुंब सहलीसाठी जाते. त्यानंतर एका हल्ल्यात त्यांचा मुलगा जखमी होतो. उपचारादरम्यान काही अनाकलनीय गोष्टी समोर येतात. त्यातून उमटणारे भावनिक तरंग या चित्रपट आहेत. 

आनंदी गोपाळ : डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांच्यावरील हा चरित्रात्मक चित्रपट आहे. पत्नीला वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी पाठविण्यासाठी झगडणाऱ्या पतीची ही कथा आहे. 

वाय : स्त्रीभ्रूण हत्या ही देशातील समस्या, त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. एक डॉक्‍टर आणि एका महिलेच्या संघर्षाची कहाणी यात आहे. 

तुझ्या आयला : एका बारा वर्षांच्या मुलाला शिव्या कुठून आल्या, हा प्रश्न पडतो, त्याच्या शोधाची ही कथा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com