Pune : स्वच्छ शहरात पुणे देशात पाचवे ; दिल्लीत झाला सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

स्वच्छ शहरात पुणे देशात पाचवे ; दिल्लीत झाला सन्मान

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराचा १७ वा क्रमांक आला होता. मात्र, यंदा महापालिकेने कामगिरी सुधारत थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्वच्छतेमध्ये देशात पाचवा क्रमांक पटकाविल्याने दिल्लीत आज (शनिवारी) सन्मान करण्यात आला.

महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख, स्वच्छ सर्वेक्षणाच्या उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत’ देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात पुन्हा एकदा इंदोरने पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा, चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. १० लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या सर्वेक्षणात देशातील ४८शहरांनी सहभाग घेतला होता.

गेल्यावर्षी पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी मोठा गाजावाजा करून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. तरीही १७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण २०२१ मध्ये महापालिकेने कोरोना काळात केलेले काम, कचरा व्यवस्थापन, प्रक्रिया, रस्ते, पादचारी मार्ग, नागरिकांचा सहभाग यासह इतर घटकांवर चांगल्या पद्धतीने काम केले. त्यामुळे कामगिरी उंचावल्याने देशात पाचवा क्रमांक मिळविला आहे.

हेही वाचा: 'आता मोदी सरकारने 'हे' देखील मान्य करावं' : राहुल गांधी

शाश्‍वत शहरासाठी प्रथम मानांकन

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पाचवा क्रमांक आलेला असला तरी सर्वोकृष्ट शाश्‍वत मोठ्या शहराचे (बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी) प्रथम क्रमांकाचे व जीएपसीचे थ्री स्टार मानांकन पुण्याने मिळवले आहे. कोरोना काळात महापालिका प्रशासनाने केलेले काम, नागरिकांचा सहभाग व त्यांचा प्रतिसाद, स्वयंसेवी संस्थांचे काम यामुळे हे मानांकन मिळाले असल्याचे अजित देशमुख यंनी सांगितले.

‘‘स्वच्छ सर्वेक्षणात लोक सहभाग वाढविल्याने महापालिकेला हे यश मिळाले आहे. भविष्यात देखील लोकसहभागातून अधिक प्रयत्न केले जातील. त्यामुळे प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीने तयारी करता येईल.

- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त

‘‘गेल्या वर्षी पुण्याचा १७ वा क्रमांक आला होता. पण यंदा देशात पाचवा क्रमांक आला आहे. या पुरस्काराचे श्रेय पुणेकर नागरिक, महापालिका प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी यांचे आहे. आगामी काळात देखील अनेक समाज समाज उपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रम राबवून पुण्याच्या गौरवात भर घातली जाईल.’

’- मुरलीधर मोहोळ, महापौर

loading image
go to top