जनता बॅंकेची आर्थिक स्थिती भक्‍कम  - जयंत काकतकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

पुणे जनता बॅंकेची सद्य:स्थिती 
ठेवीदार - 10 लाख 
ठेवी - 8 हजार 800 कोटी 
कर्जदार - 50 हजार 
कर्जवाटप - 5 हजार 200 कोटी 

पुणे - पुणे जनता सहकारी बॅंकेने काही खात्यांना अनुत्पादित कर्जाची निश्‍चिती करताना आणि रिझर्व्ह बॅंकेच्या तपासणी अधिकाऱ्यांकडून निकष निश्‍चितीचा अर्थ लावताना काही तफावत राहिली आहे. त्यामुळे 31 मार्च 2018 अखेर अनुत्पादित कर्जाची टक्‍केवारी वाढल्याचे दिसून येत आहे; परंतु मार्च 2019 नंतर जनता बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशांचे पालन केले असून, जनता बॅंकेची आर्थिक स्थिती भक्‍कम आहे, असे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर यांनी स्पष्ट केले आहे. 

जनता सहकारी बॅंक, पुणे आणि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह या बॅंकांनी नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेने दंडात्मक कारवाई केली आहे. मार्च 2018 च्या तपासणी अहवालाच्या आधारे जनता बॅंकेने अनुत्पादित कर्जासंबंधी निर्देशांचे आणि असुरक्षित कर्ज मर्यादेच्या निकषांचे पालन केले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने जनता बॅंकेला एक कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तर, जळगाव पीपल्स बॅंकेला 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. 

काकतकर यांच्या म्हणण्यानुसार, जनता सहकारी बॅंकेच्या लेखापरीक्षणानुसार मार्च 2018 अखेर अनुत्पादित कर्जे एकूण कर्जाच्या 6.92 टक्‍के आहेत. तर, रिझर्व्ह बॅंकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनुसार अनुत्पादित कर्जाची टक्‍केवारी 13.98 टक्‍के इतकी आहे. तसेच, असुरक्षित कर्ज मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे तपासणी अहवालात नमूद केले आहे; परंतु मार्च 2019 अखेर बॅंकेला अनुत्पादित कर्जासाठी 140 कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्‍यक असताना प्रत्यक्षात 213 कोटींची तरतूद केली आहे.'' 

पुणे जनता बॅंकेची सद्य:स्थिती 
ठेवीदार - 10 लाख 
ठेवी - 8 हजार 800 कोटी 
कर्जदार - 50 हजार 
कर्जवाटप - 5 हजार 200 कोटी 

बॅंकेचे लेखापरीक्षक आणि रिझर्व्ह बॅंकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी केलेल्या अनुत्पादक कर्जाच्या केलेल्या वर्गीकरणात नेहमीच तफावत आढळते. यासाठी एका अपीलीय प्राधिकरणाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच बॅंक्‍स फेडरेशनने रिझर्व्ह बॅंक आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. सहकारी बॅंकेत कोणताही गैरप्रकार नसताना केवळ नियमाचे उल्लंघन केले म्हणून इतका मोठा दंड आकारणे असमर्थनीय वाटते. 
- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स फेडरेशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Janata Bank financial position is strong