गटविकास अधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठरवावरून मासिक सभेत गोंधळ

दत्ता म्हसकर
गुरुवार, 29 मार्च 2018

जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या बदलीचा ठराव सत्ताधारी शिवसेना सदस्यांनी बुधवारच्या (ता.28) मासिक सभेत बहुमताने मंजूर केला. सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे व गटनेते दिलीप गांजाळे यांनी ही माहिती दिली. बदलीच्या या ठरावामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने सत्ताधारी व विरोधकात जुगलबंदी झाली. या ठरावाच्या वैधतेबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे.

जुन्नर - जुन्नर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या बदलीचा ठराव सत्ताधारी शिवसेना सदस्यांनी बुधवारच्या (ता.28) मासिक सभेत बहुमताने मंजूर केला. सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे व गटनेते दिलीप गांजाळे यांनी ही माहिती दिली. बदलीच्या या ठरावामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने सत्ताधारी व विरोधकात जुगलबंदी झाली. या ठरावाच्या वैधतेबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहे.

गटविकास अधिकारी गाढवे यांच्या बदलीचा ठराव मागील सभेत मांडण्यात आला होता. बुधवार ता. २८ रोजी झालेल्या मासिक सभेत मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून मंजूर करण्यात आल्याने हा ठराव मंजूर झाला. ठरावाच्या बाजूने काँग्रेसचे उपसभापती उदय भोपे यांच्यासह शिवसेनेचे सात अशा एकूण आठ सदस्यांनी पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थित असलेल्या पाच सदस्यांनी या ठरावाला विरोध केला. सभापती ललिता चव्हाण यांनी ठरावाची सूचना मांडली सदस्य रमेश खुडे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. 

गटविकास अधिकारी यांनी शिवजयंती उत्सवाच्या वेळेस पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य यांना विश्वासात न घेता कार्यक्रमांचे आयोजन केले. सध्या तालुक्यात त्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण आहे. ग्रामपंचायत पातळीवरून आलेल्या तक्रारींचे योग्य निराकरण केले जात नाही. विविध शासकीय योजना, घरकुले पाहणी, तपासणी, ग्रामसेवकांची कार्यपद्धती, प्रशासनाची अनागोंदी याला गटविकास अधिकारी जबाबदार असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशा आशयाचा ठराव मांडण्यात आला होता.  

राष्ट्रवादीच्या गटनेत्या अनघा घोडके यांनी सांगितले की, मागील सभेत शिवजयंतीच्या खर्चाच्या हिशेबावरून चर्चा झाली होती. ही सभा संपल्यानंतर सभापती चव्हाण यांनी सगळे सदस्य गटविकास अधिकारी यांच्या कामाबाबत नाराज असल्याचे सांगितले. आजच्या सभेत सदस्यांना गटविकास अधिकारी यांच्या सहीने दिलेल्या सभावृतांतामध्ये बदलीच्या ठरावाचा समावेश नव्हता. तर सभापती यांनी सभावृतांतामध्ये स्वतंत्र पान जोडून बदलीचा ठराव समाविष्ट केला होता. या पानावर गटविकास अधिकारी यांची सचिव म्हणून स्वाक्षरी नव्हती तर केवळ सभापती यांचीच स्वाक्षरी होती. यांनतर सत्ताधारी गटाचे सभापती व सदस्य हे सभागृह चालविण्याची जबाबदारी असताना देखील सभागृह सोडून गेले. 

विरोधक हे केवळ विरोधाला विरोध म्हणून या प्रकरणी राजकारण करत आहेत. जनतेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत विरोधकांना घेणे देणे नाही तसेच गटविकास अधिकारी यांची कार्यपद्धती समाधानकारक नसल्याने हा ठराव घेण्यात आला असल्याचे सत्ताधारी गटनेते दिलीप गांजाळे यांनी सांगितले. तर सभापती ललिता चव्हाण यांचा अपमान या सभेत झाल्याने सभागृहातून जाणे पसंद केल्याचे उपसभापती उदय भोपे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी गाढवे यांनी जो ठराव झालाच नाही त्या बाहेरून तयार करून आणलेल्या सभा वृत्तांतावर सचिव म्हणून सही करणे चुकीचे असल्याने सही केली नाही चुकीच्या ठरावाला मी तसेच विरोधी गटाच्या सदस्यांनी विरोध केला. 

Web Title: pune junnar transfer of the Group Development Officers