पुणे होणार "नॉलेज क्‍लस्टर' 

k vijayraghavan
k vijayraghavan

पुणे - पुणे परिसरात असलेल्या शिक्षण संस्था आणि उद्योगांच्या विस्तारामुळे हे शहर आता "नॉलेज क्‍लस्टर' होणार आहे. केंद्र सरकार त्यादृष्टीने विचार करीत असून, या सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी त्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून संबंधित घटकांशी चर्चा सुरू केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय 26 सप्टेंबरनंतर होणार असल्याचे सांगण्यात येते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) पत्रकारांशी बोलताना विजयराघवन यांनी याबाबत माहिती दिली. "आयसर'चे शशिधरन, आयुकाचे माजी संचालक डॉ. अजित केंभावी आदी या वेळी उपस्थित होते. विजयराघवन म्हणाले, 'भारतासमोर आर्थिक आणि नैसर्गिक आव्हाने आहेत. विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर शाश्‍वत उपाय शोधण्याची गरज आहे. त्यादृष्टीने "नॉलेज क्‍लस्टर'चा महत्त्वपूर्ण उपयोग होऊ शकणार आहे. उद्योग आणि शिक्षण संस्थांना जोडणारी ही व्यवस्था असेल.''

नॉलेज क्‍लस्टरद्वारे उद्योग आणि शिक्षण संस्थांना एकत्र आणले जाईल. त्यातून उद्योगांना आवश्‍यक संशोधन देण्याचा प्रयत्न यामार्फत केला जाणार आहे. तसेच, संशोधकांनाही रस असलेल्या विषयात संशोधन करण्याची मुभा या माध्यमातून दिली जाईल. एखादा वैद्यकीय डॉक्‍टर असेल आणि त्याला खगोलशास्त्रात रस असेल, त्याला तशी संधी मिळेल. नॉलेज क्‍लस्टरमध्ये ती व्यवस्था त्याला उपलब्ध होईल. संशोधनावर आधारित ज्ञाननिर्मितीसाठी उद्योग, शिक्षण, संशोधन, प्रयोगशाळा आदी घटकांना जोडण्याचा प्रमुख उद्देश, हेच नॉलेज क्‍लस्टरचे उद्दिष्ट असेल, असे त्यांनी सांगितले.

अन्य शहरांचाही विचार
पुण्याविषयी बोलताना विजयरावघन यांनी सांगितले की, पुण्यात तीसहून अधिक उद्योग समूहांबरोबर विविध बैठका झाल्या आहेत. आपल्याकडे प्रचंड ज्ञान आणि आर्थिक स्रोत आहेत. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या या शक्तींना "नॉलेज क्‍लस्टर' या व्यवस्थेद्वारे एकत्र आणण्याची गरज आहे. त्यासाठी निवडक शहरांमध्ये ही व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील असेल. कदाचित, तो उद्योजक वा शास्त्रज्ञही असू शकेल. पुण्याबराबेरच भुवनेश्‍वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांचाही आम्ही विचार करीत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com