लोकल म्हणे ९५ टक्के वेळेवर धावते! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

पुणे - पुणे-लोणावळादरम्यानची लोकल वाहतूक गेल्या वर्षभरात ९५ टक्के वेळेवर झाल्याचा दावा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे मंगळवारी केला. तर हा दावा तथ्यहीन असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. लोकल वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यासाठी वाव असल्याचेही प्रवाशांनी म्हटले आहे. 

पुणे - पुणे-लोणावळादरम्यानची लोकल वाहतूक गेल्या वर्षभरात ९५ टक्के वेळेवर झाल्याचा दावा मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे मंगळवारी केला. तर हा दावा तथ्यहीन असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. लोकल वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यासाठी वाव असल्याचेही प्रवाशांनी म्हटले आहे. 

उपनगरीय रेल्वे वाहतुकीत दररोज सुमारे एक लाख प्रवाशांची ये-जा होते. पुणे-लोणावळा मार्गावर लोकलच्या सुमारे ४२ फेऱ्या होतात. मार्च २०१७ ते एप्रिल १८ दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावण्याचे प्रमाण ८६.७३ टक्के होते. २०१८-१९ या वर्षात त्यात आठ टक्‍क्‍यांनी वाढ होऊन हे प्रमाण आता ९५ टक्के झाले आहे, असे रेल्वेच्या पुणे विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. विद्युतीकरण, देखभाल दुरुस्तीची काही कामे पूर्ण झाल्यावर वेळापत्रकानुसार लोकल धावण्याचे प्रमाण आणखी अचूक होईल, असाही दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, याबाबत ‘सकाळ’ने प्रवाशांशी संवाद साधला असता, दुपारी बारा ते अडीचदरम्यान पुरेशा लोकल नसतात, महिलांसाठीच्या डब्यांची संख्या कमी पडत आहे, लोकल वेळापत्रकानुसार धावत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 

प्रवासी म्हणतात...
श्रेया गायकवाड (नोकरदार) - 
दुपारच्या वेळी लोकलची संख्या कमी असते. लोकल नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार, याची घोषणाही स्थानकावर काही वेळा उशिरा होते. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होते. वेळापत्रकाचीही खात्री देता येत नाही, अन्‌ लोकल रद्द होण्याचे प्रमाणही जास्त आहे. 

पल्लवी शेंडगे (विद्यार्थिनी) - 
लोकलच्या महिलांच्या डब्यांची संख्या कमी असते. त्यामुळे महिलांच्या डब्यात गर्दीच्या वेळात खूप तारांबळ उडते. वेळ ९५ टक्के पाळली जाते, असा दावा रेल्वे प्रशासन करीत असले तरी त्यात तथ्य नाही. लोकल रद्द झाल्याचीही माहिती उशिरा मिळते. 

चैताली गायकवाड (विद्यार्थिनी) - 
दुपारी १२ ते २.३० दरम्यान लोकलची संख्या कमी असते. या वेळेतही प्रवासी मोठ्या संख्येने असतात. त्यांची गैरसोय होते. लोकल रद्द होण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अनेकदा मला कॉलेजला जाता येत नाही. रात्रीच्या लोकलमध्ये सुरक्षितेतबाबत कायमच काळजी वाटते. 

तीन स्थानकांवर ‘डिस्प्ले’
रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर, खडकी आणि चिंचवड रेल्वे स्थानकावर ‘कोच गाईडस डिस्प्ले बोर्ड’ बसविण्याचे काम हाती घेतले होते. ते नुकतेच पूर्ण केले आहे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. 

Web Title: Pune-Lonavla the local trains 95 per cent of the running time