

ढिंग टांग२३०८२६
पुणे म्हंजे प्रेम..!
- ब्रिटिश नंदी
निव्वळ सहा अक्षरांनी राहुलजींनी पुणेकरांची मने जिंकली. ‘पुणे म्हंजे प्रेम’ हे त्यांचे विधान सिंव्हगडाच्या पाषाणांवर कोरून ठेवण्याजोगे ऐतिहासिक आहे. पुण्याची ही वळख आम्हालाही नवी होती. पुणे म्हंजे प्रेम? पुण्यात मिसळ, आप्पे, खिचडी हे पदार्थ कुठे मिळतात, हे आम्ही डोळे मिटून सांगू. पण प्रेम कुठे मिळते, याची आम्हाला कल्पनाच नव्हती.
पुणे तिथे काय उणे? पुणे म्हंजे विद्येचे माहेरघर. पुणे म्हंजे आयटी हब. पुणे म्हंजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. (खुलासा : हा वादाचा विषय आहे, कां की पार्ले-डोंबोलीपासून नाशिक-नागपूर-कोल्हापूर-संभाजीनगरापर्यंत अनेक शहरांना आलटून पालटून हे विशेषण वापरता येते.) पुणे म्हंजे जाज्वल्ल्य इतिहाऽऽऽस!!
पण पुणे म्हंजे प्रेम हे आम्हाला राहुलजींकडून कळले. पुण्यात प्रेम कुठे मिळते? प्रेम पुण्यात कुठेही मिळते. घरोघरी (दुपारी १ ते ४ सोडून) प्रेम मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच पुणे. प्रेमाच्या असंख्य पेठा म्हंजे पुणे. एकेकाळी कुणी मुसाफिर ‘पुण्याला जातो’ असे मोठ्यांदा म्हणाला तर लोक आंबटचिंबट चेहरा करून (पहा : ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील उल्लूमशाल नाना!) ‘ॲहॅ ॲहॅ...मज्जाय एका माण्साची’ असे उद्गारत असत. पण मनुवादी नतद्रष्टांमुळे पुण्याची ही जुनी वळख हरपली, आणि विचारवंतांचे गाव म्हणून नवा गैरसमज पसरवण्यात आला.
राहुलजींचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम सुपरहिट झाल्यामुळे नतद्रष्ट कमळवाल्यांची गूंजभर इज्जत जाग्यावर राहिली नाही, हे मात्र जंगी सत्य आहे. या सुपरइव्हेंटला आम्ही स्वतः हजर होतो. प्रोग्रामचे नाव छात्रों की गूंज असे चुकून ठेवले होते. कां की ती छात्राओं की गूंज होती. कारण मांडवात सर्वत्र छात्राच होत्या. एका कोपऱ्यात फक्त बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन सपकाळ उगीच (जय हो गीताच्या तालावर) टाळ्या वाजवताना दिसले. बाळासाहेब सपकाळजींच्या कानात सांगत होते की, ‘‘आपण पण टीशर्ट घालून याल पायजे होतं...,’’ त्यावर सपकाळजी म्हणाले की, ‘‘मी आतमधी घातलेलाच आहे, इशारा झाला की कुर्ता हवेत फेकणार!’’ बाळासाहेबांनी जागा बदलली!
यशोमती ठाकूरबाई उत्साहाने इतर समवयस्क मुलींना प्रोत्साहन देत होत्या. प्रणीतीताई शिंदे तर त्या क्राऊडमध्ये इतक्या मिसळून गेल्या होत्या की, बसमधून इतर जेनझी मुलींसारख्या आत्ताच उतरल्या! पण आश्चर्याची बाब म्हंजे पक्षभेद विसरून तिथं आमच्या फेवरिट सुष्माताई अंधारेदेखील दिसल्या. त्या तिथं काय करत आहेत? असे आम्हाला वाटल्याने त्यांच्याकडे गेलो. तर त्या फणकारून म्हणाल्या, ‘‘गोदी मीडिया आहात तुम्ही! निघा!!’’
खुद्द राहुलजींनी मंचाचा कब्जा घेतला, आणि सारा माहौलच पालटला. पिवळ्याजर्द सदऱ्यातील राहुलजी मंचावर आले, आणि टाळ्या-गजराचा कडकडाट झाला. ते पिवळ्या पिवळ्या सदऱ्यातील रिमझिमते स्माइल. ‘पुणे म्हंजे प्रेम’ हे तीन शब्द त्यांनी उच्चारताच झालेला कल्लोळ…अहह! रा-हुल, रा-हुल, रा-हुल’ च्या आरोळ्यांनी सिंहगड हादरला. खडकवासल्याच्या धरणातले पाणी थरथरल्याने तेथील धरण अभियंता घाबरल्याची वदंता आहे. मनुवादाला तिलांजली देऊन पितृसत्ताक वर्चस्व झुगारून देण्याची ललकारी त्यांनी मंचावरून दिली. मनुवादी, नमोवाद्यांची इथंच तंतरली.
पुणे म्हंजे प्रेम हे बाकी खरेच आहे. जिथे विरघळलेल्या आइस्क्रीममध्ये आणखी आइस्क्रीमचा गोळा घालून त्यास मस्तानी म्हणतात, तिथल्या हवेत प्रेम नाहीतर काय असणार? मस्तानी हे सेमी-पेय फक्त पुण्यातच का मिळते? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर आम्ही बाजीरावासारखे विजयी चरणचालीने परतलो. चित्ते की चाल, बाज की नजर और बाजीराव की मस्तानी पर कभी संदेह नही करते! क्या समझे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.